पेडमाऊंट, (अमेरिका) : अमेरिकेच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागात आलेल्या वादळामुळे किमान ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळाने अनेक घरे आणि शाळांचे नुकसान झाले असून झाडेही उन्मळून पडली आहेत. वायन काऊंटीमध्ये अनेक घरे कोसळली असून ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकून पडले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तर तीन वेगवेगळ्या काऊंटीमध्ये ६ ठार झाले असून अन्य तिघे बेपत्ता झाले असल्याचे मिसिसीपीचे गव्हर्नर टेट रीव्हज यांनी शनिवारी संध्याकाळी सांगितले.
वादळ आता पूर्वेकडील अल्बामा प्रांताच्या दिशेने सरकले असून या प्रांतात देखील वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच झाडे पडल्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अर्कान्सास प्रांतात देखील तिघांचा मृत्यू झाला आहे. या प्रांताचे गव्हर्नर हुकाबी सॅन्डर्स यांनी आणीबाणीची घोषणा केली आहे.
जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांनीही वादळ आपल्या प्रांतात येणार असल्याची शक्यता गृहित धरून आणीबाणी घोषित केली आहे. रविवारी सकाळी जॉर्जिया इमर्जन्सी मॅनेजमेंट ऍन्ड होमलॅन्ड सिक्युरीटी एजन्सीने सोशल मीडियावरून रा,ट्रीय हवामान सेवेने दिलेला वादळासंबंधीचा इशारा पुन्हा पोस्ट केला आहे. वादळामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. वादळाबरोबर धुळीची वावटळ देखील उठण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
शुक्रवारी कनास प्रांतातल्या धुळीच्या वादळामुळे महामार्गावर अनेक वाहने एकमेकांवर आदळली होती. यात ८ जण मरण पावले होते. टेक्सासमधील अमारिलो भागातही अनेक वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे तिघे ठार झाले होते. या वादळामुळे उत्तरेकडील थंड प्रांतांसह दक्षिणेकडील कोरडे हवामान असलेल्या प्रांतांमधील किमान १०० दशलक्ष लोकांना फटका बसण्याची भीती आहे. ओकलाहोमा येथील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश आहेत. तब्बल १३० ठिकाणी आग लागली. तर ३०० घरांचे नुकसान होण्याच्या घटनांचीही नोंद झाली आहे.