पुणे जिल्हा | निमसाखर परिसरात वादळाने शेतकर्यांचे नुकसान

वालचंदनगर, (वार्ताहर) – निमसाखर (ता. इंदापूर) हद्दीतील रणमोडेवस्ती व परिसरात रविवारी (दि. 19) रात्री वादळी वार्यासह अवकाळी अल्प पाऊस झाला. शेतकर्यांच्या शेतातील पत्राशेड, सौरप्लँट उडाले. नारळाची झाडे पडली तर मुख्य विद्युत वाहिनीचे खांब पडल्याने दुसर्या दिवशी दुपारपर्यंत निमसाखर उपकेंद्र परिसरात विद्युत बंदमुळे नागरिक हैराण झाले होते.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निमसाखर व परिसरातील वाड्यावरत्यांवर वादळी वार्यासह अल्प पाऊस झाला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वार्याला सुरुवात होत दरम्यान अवकाळी अल्प पाऊस या परिसरात झाला. दरम्यान निमसाखर गावच्या हद्दीत असलेल्या रणमोडे वस्ती परिसराला मोठ्या प्रमाणावर या वादळी वार्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे फटका बसला.
नानासाहेब व राजेंद्र सर्जेराव रणमोडे बंधुंबरोबरच दत्तात्रय यशवंत सूर्यवंशी यांचे देखील सौर ऊर्जेचे प्लँट उद्ध्वस्त होत, सौर प्लेटा शंभर मीटर अंतरावर जाऊन विखुरलेल्या स्वरुपात इकडेतिकडे पडल्या. घराजवळ उभ्या असलेल्या दुचाकी गाड्या देखील धडाधड पडल्याच्या थरार सांगताना अंगावर काटा उभा राहत होता.
येथीलच निलेश देवराव मोरे यांच्या घराजवळील गाडीसाठीचे पत्राशेडचे पत्रे उडून लगत असलेल्या घरावरील सिमेंट पत्र्यावर पडून सिमेंट पत्र्याला मोठ्या प्रमाणावर तडे गेले. काही घराची पाने उडून गेली.
याचबरोबर घराजवळ असलेली तीन नारळाची झाडे या जबरदस्त वादळामध्ये जमीनदोस्त झाली. याचबरोबर निलेश देवराव मोरे व बाळासाहेब मोहिते यांच्या शेतातील डाळिंब फळबाग क्षेत्रामध्ये अनेक झाडे उन्मळून पडली. तर लागलेल्या डाळिंबाची फळे खाली पडून मोठे नुकसान झाले.
या वस्ती लगतच असलेल्या बाल गणेश मंडळाचा शेड सुध्दा यामध्ये वाचू शकले नसून हे पत्राशेडचे मोठे नुकसान झाले. सध्या आंब्याचा हंगाम असून या वादळी वार्यामुळे ठिकठिकाणी आंब्याच्या झाडाखाली पडलेल्या आंब्याची रास पाहायला मिळत होती. परिसरात पहाणी करत असताना कडुलिंबाची झाडे देखील ठिकठिकाणी मुळासकट पडल्याचे चित्र पाहायला मिळत होते. याच भागातील नारायण लक्ष्मण रणमोडे यांचे शेतामध्ये रेशीमचे पत्रा शेड पडुन मोठे नुकसान झाले.
निमसाखर हद्दीतील रणमोडे वस्ती पासून काही अंतरावरुन वालचंद नगरपासून निमसाखर उपकेंद्राला जाणारी मुख्य विद्युत वाहिनीचे खांब आहेत. नुकत्याच मोठ्या प्रमाणावर झालेल्या वादळी वारा व अल्प पावसामुळे मुख्य वाहिनीचे सिमेंट खांब मोडून पडले तर काही खांब कोसळले.
यामुळे निमसाखर 33/11 उपकेंद्रा अंतर्गत येणार्या निमसाखर गाव, निरवांगी, खोरोची, दगडवाडी, घोरपडवाडीसह अन्य भागाला विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सोमवारी (दि. 20) दुपारी बातमी लिहीपर्यंत खंडीत अवस्थेत होता. याचबरोबर कारंडेवस्ती भागातही विद्युत वितरण कंपनीचा डीपी व काम पडल्याचे सांगण्यात येत होते. या वादळी वार्यामुळे सुमारे आठ ते दहा विद्युत खांब पडल्याचे या भागातील शेतकरी सांगत आहेत.
पंचनामे सुरू
निमसाखर हद्दीतील रणमोडेवस्ती परिसरात नुकतेच झालेल्या वादळी वार्यामुळे परिसरातील घरे, फळ झाडे, सौर विद्युत पॅनल, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तीव्रता ओळखून निमसाखर तलाठी कार्यालयाकडून नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली.
याबद्दल महसूल विभागाचे आभार व्यक्त करत नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळेल या दृष्टिकोनातूनही प्रयत्न व्हावेत अशी मागणी प्रगतशील शेतकरी निलेश देवराव मोरे यांनी केली.
वीज नसल्याने पाण्याचेही हाल
शेतकर्यांचा शेतीबरोबर जोडधंदा म्हणून गोपालनाचा धंदा म्हणून ओळखला जातो. मात्र या धंद्यामध्ये जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी लाईटच नसेल तर जनावरांना पाणी पाजायचे कसे? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी उन्हाची परवाना करता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. या दोन्हीमध्ये मात्र नागरिकांना पिण्याचे पाण्याचे व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे.





