वाया जाणाऱ्या पाण्याला अटकाव

दैनिक “प्रभात’च्या वृत्ताची दखल : वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचले

वानवडी – उपनगरांत दिवसेंदिवस पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. नुकत्याच पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असतानाच दुसरीकडे वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीमधील पाण्याच्या टाक्‍या भरून रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त दैनिक “प्रभात’मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून त्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.

वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात दररोज लाखो लिटर पाणी वाया जात होते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते. पुणे जिल्ह्यात व शहराच्या उपनगराच्या दक्षिण भागातील गावांत दुष्काळाची झळ दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणी समस्या गंभीर होत आहे. दिवसेंदिवस पुणे शहरात लोकसंख्येचे प्रमाण वाढत चालले आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय वानवडी येथे केपीसीटी इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे. केपीसीटी इमारतीमध्ये टेरेसवर पाण्याच्या टाक्‍या आहेत. या टाक्‍या भरल्यानंतर ओव्हर फ्लो होवनू पाणी वाया जाते. त्यामुळे परिसरात पाण्याची डबकी साचत होती. पिण्याच्या पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त दैनिक “प्रभात’मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाने त्वरीत यावर कारवाई केली. कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी दैनिकत “प्रभात’चे आभार मानले.

आरोग्य विभागाकडून “केपीसीटी’ इमारतीच्या व्यवस्थापकांना पाणी वाया जात असल्यामुळे नोटीस बाजावत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

– प्रदीप राऊत, आरोग्य निरीक्षक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.