पुणे जिल्हा | निमगाव भोगीचे प्रदूषण थांबवा

रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- निमगाव भोगी येथे रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लि. कंपनीकडून होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात विधानसभेत व संसदेत आवाज उठवून आम्हाला न्याय द्यावा या मागणीचे निवेदन निमगाव भोगी ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार रोहित पवार व खासदार डाँ. अमोल कोल्हे यांना देण्यात आले आहे.
निवेदनात निमगाव भोगी येथे कंपनीकडून होत असलेल्या प्रदूषणाबाबत वारंवार आम्ही वरिष्ठ कार्यालाकडे तसेच महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनीकडेही पत्र व्यवहार करून कोणत्याही प्रकारची दाद मिळत नाही.
कंपनीकडून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे गावातील ४ गाई, ७ शेळ्या, २ बोकड यांचा मृत्यू झालेला आहे. ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीनी विरोध करून देखील कंपनीने वाढीव क्षेत्र धारण केले आहे. ही बाब संतापजनक आहे.
गावात लोकांच्या आरोग्याचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जमीनी नापीक झालेल्या आहे. पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झालेले आहे. त्या पाण्यामुळे लोकांना अनेक साथीचे रोग उद्भवले आहे. लोकांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अशीच जर परिस्थिती राहिली तर गावात जनावरांसोबत माणसांचे जीवनमान धोक्यात येईल. भयावह परिस्थिती निर्माण होईल तरी कंपनीने घेतलेले वाढीव क्षेत्र रद्द करावे तसेच शेतकऱ्यांची नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच उज्वला अंकुश इचके यांनी केली आहे.




