लाहोर – भारतातून पाकिस्तानमध्ये जाऊन धर्मांतर केलेल्या आणि स्थानिक मुस्लिम व्यक्तीशी विवाह केलेल्या शीख महिलेचा छळ थांबवा, असे आदेश पाकिस्तानमधील उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. सरबजीत कौर या गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त पाकिस्तानमध्ये गेल्या आणि तेथील नासिर हुसेन या व्यक्तीशी विवाह करून स्थायिक झाल्या आहेत. आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचे त्यांनी एका व्हिडीओ संदेशामध्ये म्हटले होते. मंगळवारी कौर आणि हुसेन यांनी लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि पोलिसांनी शेखुपुरातील फारुखाबाद येथील त्यांच्या घरावर बेकायदेशीरपणे छापा टाकला आणि लग्न मोडण्यासाठी दबाव आणला, अशी तक्रार केली. आपण हुसेनला ९ वर्षांपासून सोशल मीडियावरून ओळखत आहोत. मी घटस्फोटित असून हुसेनशी विवाह करण्यासाठीच पाकिस्तानला आले आहे. आपला पती पाकिस्तानचा नागरिक आहे आणि आपल्या व्हिसाची मुदत वाढवून पाकिस्तानी नागरिकत्व मिळविण्यासाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे, असे कौर यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर सरबजीत कौर यांना नूर असे नवीन नाव देण्यात आले आहे. कौर पाकिस्तानमधून परत न आल्यामुळे कपुरथळाच्या पोलिसांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतली आणि शोध सुरू केला आहे. कौर यांचे पती अनेक वर्षांपासून विदेशात आहेत असे सांगितले जाते आहे. त्यांना दोन मुले देखील आहेत.