इराणकडून तेल आयात करणे थांबवा अन्यथा निर्बंधांचा सामना करावा लागेल- अमेरिका

निर्बंधांचा सामना करावा लागेल; भारत, चीन, जपानसह पाच देशांना अमेरिकेची सूचना

वॉशिंग्टन – इराणवरील निर्बंध अधिक कडक करण्याच्या दृष्टीने अमेरिकेने आज भारत आणि चीनसह पाच देशांना इराणकडून तेल आयात करणे थांबवण्याची सूचना केली आहे. भारत, चीन आणि जपानसह या पाच देशांनी इराणकडून तेल आयात करणे थांबवले नाही, तर अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जाण्याचा इशाराही अमेरिकेने दिला आहे.

वर्षभरापूर्वी इराणबरोबरच्या आण्विक करारातून अमेरिकेने माघार घेतली होती. त्यानंतर अमेरिकेने इराणवर कठोर आर्थिक निर्बंधही लादले होते. इराणबरोबरच्या व्यापाराबाबतच्या निर्बंधांमधून गेल्यावर्षी 8 देशांना 180 दिवसांची तात्पुरती सवलत दिली गेली होती. या देशांनी इराणकडील तेल आयातीचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे अमेरिकेने ही सवलत दिली होती. मात्र आता हे निर्बंध अधिक कडक करण्याचे धोरण ट्रम्प प्रशासनाने स्वीकारले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी पाच देशांना केलेल्या सूचनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. सध्या इराणकडून तेल आयात करणाऱ्या देशांना निर्बंधांमधून मिळणारी सवलत 2 मे रोजी समाप्त होईल, असे पॉम्पेओ यांनी सांगितले. युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधील विकासासाठी संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ओमानच्या आखातातील बंदराच्या विकासामध्ये दिलेले योगदान लक्षात घेऊन अमेरिकेने भारताला निर्बंधांमधून सवलत दिली होती.

मे 2016 मध्ये भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये वाहतुकीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात एक करार करण्यात आला होता. इराणमधील प्रमुख प्रादेशिक बंदर म्हणून चाबहार बंदराचा वापर केला जाण्याचे नियोजित होते. सध्या इराणकडून सर्वाधिक तेलाची आयात चीन आणि भारताकडून केली जाते. जर ट्रम्प यांच्या मागणीनुसार या दोन्ही देशांनी तेल आयात कमी केली नाही, तर दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध ताणले जाऊ शकतात. त्याचा व्यापारासारख्या अन्य विषयांवरही परिणाम होऊ शकतो.

जगभरात सौदी अरेबियापाठोपाठ इराण हा तिसऱ्या क्रमांकाचा तेलपुरवठादार देश आहे. इराणकडून एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 या आर्थिक वर्षात 18.4 दशलक्ष टन क्रूड तेलाचा पुरवठा केला गेला. भारत, चीनव्यतिरिक्‍त दक्षिण कोरिया आणि जपान इराणकडून तेलाची आयात करतात. मात्र, त्यांच्या आयातीचे प्रमाण फार कमी आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमधून पुन्हा सवलत मिळावी, अशी अपेक्षा तुर्कीने केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.