प्रभात वृत्तसेवा जुन्नर – जुन्नर तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून दिवाळी किराणा माल तसेच इतर विविध भेट वस्तूंचे वाटप पतसंस्थांच्या सभासदांना करण्यात येते; मात्र यामुळे तालुक्यातील लहान मोठ्या किराणा व्यापारी व इतर विविध व्यापारी बांधवांसमोर अनेक व्यावसायिक प्रश्न उभे राहत असून त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याने अशा प्रकारे दिवाळीत होणारे विविध भेटवस्तू तातडीने बंद करण्याची मागणी जुन्नर सहायक निबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे. सहायक निबंधक गजेंद्र देशमुख यांच्याकडे या मागणीचे निवेदन जुन्नर तालुका डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन, जुन्नर तालुका रिटेल व्यापार असोसिएशन, पुणे जिल्हा रिटेलर व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आले. यावेळी विमलेश गांधी, संदीप शहा, सुनिल शिंदे, निलेश जाधव, कल्पेश गुगळे, अभय पाटे, आनंद गुगळे, नितीन पन्हाळे, सुनील चांदवडकर, दिगंबर बावबंदे, संजय दिवटे, प्रशांत फल्ले, आशिष गांधी उपस्थित होते.जुन्नर तालुक्यामध्ये सुमारे 4 हजार व्यापारी बांधव आपले लहान मोठे व्यवसाय करीत असून त्यांचा उदरनिर्वाह या व्यापारावरच चालत असतो. ऑनलाइन मार्केटिंग, मॉल संस्कृती तसेच वाढत जाणारी विविध दुकानांची संख्या, जीवघेणी स्पर्धा यांच्याशी सामना करीत व्यापारी आपला व्यवसाय करीत असतात; परंतु तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून प्रत्येक दिवाळीला सभासदांकरिता लाभांशा कोटी, किराणा मालाचे किट तसेच इतर विविध वस्तूंचे भेट वाटप केले जाते. अनेक पतसंस्थांनामध्ये घरातील 3, 4 सभासद असल्याने एकेका घरात 3, 4 किराणा माल किट दिले जाते. त्यामुळे हे सभासद बाजार पेठेतून दिवाळी किराणा माल खरेदी करतच नाही. यामुळे लहान मोठ्या किराणा मालाच्या व्यापारांपुढे धंदा कसा होणार खरेदी केलेला माल कधी संपणार? आदी प्रश्न उभे राहत आहेत. पतसंस्थांकडून देण्यात येणार्या दिवाळी किट मध्ये विविध किराणा माल सुगंधी तेले, उटणे पासून अनेक गरजेच्या वस्तू दिल्या जात असून कित्येक हजारांच्या संख्येत ही किट भेट रूपाने दिली जात आहे. याकरिता ही दिवाळी भेट योजना व विविध वस्तूंचे होणारे वाटप तातडीने बंद करण्याची मागणी जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, बेल्हे या परिसरातील अनेक व्यापार्यांकडून करण्यात आलेली आहे. लाभांशव्यतिरिक्त काही देऊ नये.. दरम्यान शासनाच्या 18 ऑक्टोबर 2000 मधील आदेशानुसार नागरी सहकारी पतसंस्थांनी लाभांश व्यतिरिक्त सभासदांना कोणताही बोनस वस्तू आधारित प्रलोभन अथवा विशेष देवके देने निषिद्ध असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सहायक निबंधक जुन्नर यांनी निवेदनाचा स्वीकार करून सहकार करून सहकार आयुक्त पुणे कार्यालयात संपर्क करून तेथून आलेल्या आदेशानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे व्यापारी बांधवांना सांगितले.