गया (बिहार) : बिहार विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली आहे. गया जिल्ह्यातील बाराचट्टी विधानसभा मतदारसंघात एनडीएच्या महिला उमेदवार आणि ‘हम’ (हिंदुस्तान अवाम मोर्चा) पक्षाच्या आमदार ज्योती मांझी यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचे डोकं फुटल्याने त्या जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती मांझी या मंगळवारी आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी निघाल्या होत्या. त्या सुलेबट्टा वळणाजवळ आल्या असता, दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अचानक दगडफेक केली. दगड त्यांच्या डोक्याला लागल्याने त्या जखमी झाल्या. जखमी झाल्यानंतर त्या रडू लागल्या आणि तातडीने गाडीत बसवून बाराचट्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं. ज्योती मांझी या केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या नात्यातील असून, त्यांच्या वहिनी आहेत. त्या ‘हम’ पक्षाकडून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात याआधीही ‘हम’ पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार वाहनांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी खरांती गावात अज्ञात तरुणांनी प्रचार गाड्यांवरील पोस्टर फाडले, तर मोहनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देमा गावात गर्दीत घुसून काही अज्ञातांनी “ज्योती मांझी मुर्दाबाद, राजद जिंदाबाद” अशा घोषणा देत गोंधळ घातला होता. दरम्यान, हिंसाचाराची दुसरी घटना गयातील टिकारी मतदारसंघातही घडली आहे. येथील ‘हम’ पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार अनिल कुमार यांच्या ताफ्यावर दिघौरा गावात विटा-दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आमदार अनिल कुमार यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली असून, त्यांच्या ताफ्यातील काही वाहनांच्या काचा फुटल्या. पोलिसांनी या प्रकरणी नऊ संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. सध्या दोन्ही हल्ल्यांमुळे गया जिल्ह्यातील निवडणूक वातावरण ताणलेले असून, पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.