आघीत एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या

जवळा – जामखेड तालुक्‍यातील आघी येथील मुनीदेव परमानंद आश्रमात गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी टाकलेल्या दरोड्यात देवाचे सोन्याचे साहित्य चोरीस जाण्याची घटना उघडकीस आली. आघी गावात इतर दोन ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेत लाखोंचा ऐवज चोरीस गेला आहे. चोरीच्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि.1) रात्री अकरा वाजता आश्रमाचे संचालक विजयराज लासुरकर महानुभव हे आपल्या सहकाऱ्यांसह जेवण करून झोपी गेले होते. आश्रमातील एका खोलीतील कपाटात देवाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली होती.

पहाटे चारच्या सुमारास संचालक विजयराज महानुभव हे उठून आश्रमाच्या अंगणात प्रदक्षिणा घालत असताना त्यांना देवाचे साहित्य ठेवलेल्या रूमच्या शेजारील हॉलची खिडकी अर्धवट उघडी असलेली दिसून आली. यावेळी त्यांनी देवाचे दागिने व इतर साहित्य ठेवलेल्या रूमकडे जाऊन पाहिले असता रूमचे कुुुुलूप गायब असल्याचे दिसले. रूमला फक्त कडी लावली असल्याचे दिसून आले. यावेळी रूम उघडून आतमध्ये जाऊन पाहिले असता रूममधील कपाटाचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. कपाटात जाऊन पाहिले असता दागिने व रोख रक्कम गायब झालेली होती.

मुनीदेव परमानंद आश्रमातून अज्ञात चोरट्यांनी रोख वीस हजार रुपये तसेच पंधरा हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाचे देवाचे सहा जोड्या सोन्याचे डोळे तसेच देवाच्या कपाळावरील तीन नग टिळे याशिवाय दोन हजार रूपये किमतीचे अकरा भार वजनाचे चांदीचे कडे असा एकूण सुमारे 37 हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान आश्रमाचे संचालक विजयराज महानुभव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आश्रमात चोरी करणाऱ्या चोरट्यांनी गावातील इतर दोन ठिकाणी चोरी केल्याचीही घटना उघडकीस आली आहे. यामध्ये प्रकाश इंगळे यांची 35 हजार रुपयांची रोकड तर पोपट इंगळे यांची सात तोळे सोने व दहा हजार रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.