गोव्यातील मद्याचा आंबेगावात साठा

पुणे : फक्त गोवा राज्यात विक्रीची परवानगी असलेल्या मद्याचा आंबेगाव (जि. पुणे) परिसरात अवैध साठा आढळून आला. त्याची बाजारातील किंमत सुमारे 80 लाख रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणी सहा जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. जी. तापडिया यांनी हा आदेश दिला.
मंगेश पोपट मोरे (रा. खंडाळा), अक्षय बाळासाहेब हुलगे (रा. उजनी कॉलनी, पंढरपूर), पंकज देवनारायण निसाद (रा. कात्रज), रवींद्र अशोक घारगे (रा. कात्रज), नारायण मारुती निवंगुणे (रा. वेल्हे) आणि फ्रेडी जोसफ लोबो (रा. पुणे कॅम्प) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एस. जे. भोर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींच्या जामीन अर्जास सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी विरोध केला. “अटक आरोपींनी परराज्यातील विदेशी मद्याची विक्री करण्याचे उद्देशाने राज्यात वाहतूक केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, गुन्हा हा शासन महसूल तसेच मानवी आरोग्याशी संबंधित आहे,’ असा युक्तिवाद त्यांनी केला.





