Stock Market: भारतीय शेअर बाजारात सोमवारी (२२ डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. विदेशी गुंतवणूकदारांचे पुनरागमन आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ६३८.३३ अंकांनी (०.७५%) झेप घेत ८५,५६७.४८ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ २०६ अंकांनी (०.७९%) वधारून २६,१७२.४० च्या पातळीवर बंद झाला. या तेजीमुळे बीएसईवर (BSE) सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४७१.२१ लाख कोटींवरून थेट ४७५.२४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. परिणामी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात ४.०३ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. तेजीची ही ‘६’ प्रमुख कारणे: विदेशी गुंतवणूकदारांची (FII) वापसी: गेल्या १४ दिवसांपासून सातत्याने विक्री करणाऱ्या विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदी सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत त्यांनी सुमारे ३,७७६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. फेडरल रिझर्व्हकडून दरकपातीची अपेक्षा: अमेरिकेतील व्याजदरात कपात होण्याची शक्यता वाढल्याने उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूक वाढण्याची चिन्हे आहेत. मजबूत जागतिक संकेत: आशियाई बाजारात जपानचा निक्केई आणि हाँगकाँगचा हँगसेंग इंडेक्स वधारल्याने भारतीय बाजाराला बळ मिळाले. रुपयाची मजबूती: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया २२ पैशांनी मजबूत होऊन ८९.४५ च्या पातळीवर पोहोचला, ज्याचा फायदा बाजाराला झाला. IT शेअर्समध्ये मोठी खरेदी: ॲक्सेंचरच्या चांगल्या निकालानंतर निफ्टी आयटी इंडेक्समध्ये १.२ टक्क्यांची वाढ झाली. इन्फोसिस आणि विप्रोसारख्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली. RBI बैठकीचे फलित: आरबीआयच्या भविष्यात व्याजदर कपातीची शक्यता वर्तवण्यात आल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. क्षेत्रीय कामगिरी (Sectoral Outlook): आजच्या व्यवहारात कंज्युमर ड्युरेबल्स वगळता सर्वच क्षेत्रात हिरवळ पाहायला मिळाली. बँकिंग, मेटल आणि आयटी क्षेत्रात मोठी खरेदी झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकैप निर्देशांकातही १ टक्क्यापर्यंत वाढ नोंदवण्यात आली. ‘हे’ शेअर्स ठरले टॉप गेनर्स: सेन्सेक्समधील ३० पैकी २५ शेअर्स वधारले. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ३.५६ टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानी राहिली. त्यापाठोपाठ कोटक बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडिगो आणि बजाज फायनान्स या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. दुसरीकडे, एचसीएल टेक आणि सन फार्मा यांसारख्या मोजक्या शेअर्समध्ये घसरण झाली. “बाजारात आता वर्षाअखेरची रॅली सुरू झाल्याचे चित्र आहे. निफ्टीसाठी २६,३०० ही पुढील महत्त्वाची पातळी असून, गुंतवणूकदारांनी सकारात्मक राहण्यास हरकत नाही,” असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सच्या तज्ज्ञांनी नमूद केले.