Stock Market crash: पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि रुपयाची विक्रमी घसरण यामुळे देशांतर्गत शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात कोसळला. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास २ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स १,४५६.०४ अंकांनी म्हणजेच १.९२ टक्क्यांनी घसरून ७४,५५९.२४ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो तब्बल १,५६५.७८ अंकांनी कोसळून ७४,४४९.५० या पातळीवर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४३६.३० अंकांनी म्हणजेच १.८३ टक्क्यांनी घसरून २३,३७९.५५ वर स्थिरावला. एकमेव SBI मध्ये वाढ – सेन्सेक्समधील टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), टायटन आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. तर स्टेट बँक ऑफ इंडिया हा एकमेव वाढ नोंदवणारा समभाग ठरला. क्रूड १०७ , रुपया ९५.६३वर – जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचा भाव २.७५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०७.१ डॉलरवर पोहोचला. त्याचवेळी रुपयाने डॉलरच्या तुलनेत आणखी ३५ पैशांची घसरण नोंदवत ९५.६३ या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबतच्या युद्धविरामाबाबत अनिश्चितता व्यक्त केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्यानंतर पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹१० लाख कोटींची घट – ११ मे २०२६ रोजी बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ₹४,६६,५८,५६९.६८४ कोटी इतके होते. मात्र, १२ मे २०२६ रोजी शेअर बाजारातील जोरदार घसरणीमुळे हे बाजार भांडवल ₹४,५६,९९,९४५.७८ कोटींवर आले. त्यामुळे अवघ्या एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ₹१०,२२,८१९ कोटींची घट झाली. विश्लेषकांचे मत – लिव्हलाँग वेल्थचे संस्थापक व संशोधन विश्लेषक हरिप्रसाद के. यांनी सांगितले की, सध्याची घसरण ही केवळ नफावसुली नसून बाजारातील विश्वास डळमळीत झाल्याचे संकेत आहेत. वाढते कच्च्या तेलाचे दर, रुपयाची घसरण आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची आक्रमक विक्री या ‘तिहेरी दबावामुळे’ बाजारावर परिणाम होत आहे. सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ८,४३७.५६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली होती. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत असून त्याचा थेट परिणाम रुपया आणि भारतीय शेअर बाजारावर होत आहे. माहिती-तंत्रज्ञान आणि रिअल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. जागतिक बाजारही घसरले – आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय एसएसई कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरले, तर जपानचा निक्केई निर्देशांक वाढीसह बंद झाला. युरोपियन बाजारातही घसरणीचे वातावरण होते.