Stock market: कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात बुधवारी दिवसभर चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र, अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टीने किरकोळ वाढ नोंदवत सलग चार दिवसांची घसरण थांबवली. मुंबई शेअर बाजाराचा ३० समभागांचा सेन्सेक्स ४९.७४ अंकांनी अर्थात ०.०७ टक्क्यांनी वधारून ७४,६०८.९८ अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ७५,१९१.५७ या उच्चांकी तर ७४,१३४.४८ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दिवसभरात निर्देशांकात तब्बल १,०५७ अंकांची चढ-उतार झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३३.०५ अंकांनी म्हणजे ०.१४ टक्क्यांनी वाढून २३,४१२.६० अंकांवर स्थिरावला. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹२.७२ लाख कोटींची वाढ – (Stock market) मागील कारोबारी दिवशी म्हणजेच १२ मे २०२६ रोजी बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ₹४,५५,८०,८४२.६२ कोटी होते. आज म्हणजे १३ मे २०२६ रोजी बाजारातील चढ-उतारांदरम्यान हे मूल्य वाढून ₹४,५८,५३,३१३.१८ कोटींवर पोहोचले. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹२,७२,४७०.५६ कोटींची वाढ झाली आहे. कोणते शेअर्स वाढले कोणते घसरले? Stock market: सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ वाढीसह बंद सेन्सेक्समधील समभागांमध्ये एशियन पेंट्स, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल आणि लार्सन अँड टुब्रो यांना चांगली मागणी होती. तर महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, सन फार्मा आणि टेक महिंद्रा हे समभाग घसरणीत राहिले. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा दर ०.५ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल १०७.२७ डॉलरवर आला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी १,९५९.३९ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याची माहिती शेअर बाजार आकडेवारीतून समोर आली आहे. तज्ज्ञांचे मत – (Stock market) ‘सलग दोन मोठ्या घसरणीच्या सत्रांनंतर बुधवारी बाजारात काहीशी स्थिरता दिसून आली. निर्देशांकांनी हिरव्या निशाणीसह बंद होत गुंतवणूकदारांना दिलासा दिला असला, तरी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक चिंतांमुळे बाजारातील एकूणच वातावरण सावधच राहिले आहे,’ असे ‘लाइफलाँग वेल्थ’चे संशोधन विश्लेषक आणि संस्थापक हरिप्रसाद के. यांनी सांगितले. दरम्यान, एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर किंचित वाढून ३.४८ टक्क्यांवर पोहोचल्याची सरकारी आकडेवारी मंगळवारी जाहीर झाली. सोने-चांदीचे दागिने आणि काही खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाईत वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आशियाई बाजारांची स्थिती – (Stock market) आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई-२२५, शांघाय एसएसई कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक वाढीसह बंद झाले. युरोपीय बाजारात मिश्र कल दिसून आला, तर अमेरिकन बाजार मंगळवारी बहुतांश घसरणीसह बंद झाले होते. मंगळवारी सेन्सेक्स १,४५६.०४ अंकांनी कोसळून ७४,५५९.२४ अंकांवर, तर निफ्टी ४३६.३० अंकांनी घसरून २३,३७९.५५ अंकांवर बंद झाला होता.