Stock Market : भू-राजकीय तणावाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स सपाट, निफ्टी घसरला
Stock Market : अमेरिका-इराण-इस्त्राईलमधील नव्याने वाढलेल्या संघर्षामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाल्याने बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराने दिवसातील बहुतांश वाढ गमावली. सेन्सेक्स किरकोळ वाढीसह बंद झाला, तर निफ्टी घसरणीसह स्थिरावला.

Stock Market : अमेरिका-इराण-इस्त्राईलमधील नव्याने वाढलेल्या संघर्षामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाल्याने बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराने दिवसातील बहुतांश वाढ गमावली. सेन्सेक्स किरकोळ वाढीसह बंद झाला, तर निफ्टी घसरणीसह स्थिरावला.
मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) ३० समभागांचा सेन्सेक्स ६४.४२ अंकांनी अर्थात ०.०९ टक्क्यांनी वधारून ७३,९८३.१८ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो ६९४.२५ अंकांच्या उसळीसह ७४,६१३.०१ या उच्चांकी पातळीपर्यंत पोहोचला होता. मात्र दिवसअखेरीस पुन्हा घसरण झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी २७.१५ अंकांनी अर्थात ०.१२ टक्क्यांनी घसरून २३,२१४.९५ वर बंद झाला. दिवसभरात निफ्टीने २३,४२५.३५ हा उच्चांक आणि २३,१८४.६० हा नीचांक गाठला.
कोणते शेअर्स वाढले-घसरले ? (Stock Market)
सेन्सेक्समधील समभागांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी आणि एचडीएफसी बँक यांनी चांगली कामगिरी केली. तर इटर्नल लिमिटेड, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह आणि टायटन यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीला ₹३.४७ लाख कोटींचा फटका – (Stock Market )
एका व्यवहाराच्या दिवसापूर्वी म्हणजेच ०९ जून २०२६ रोजी ‘बीएसई’वर (BSE) लिस्टेड असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप (बाजार भांडवल) ₹४,५९,०४,९२२.६०२ कोटी होते. आज म्हणजेच १० जून २०२६ रोजी ते घटून ₹४,५५,५७,८४१.७८ कोटींवर आले. याचा अर्थ असा की, आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात ₹३,४७,०८०.८२२ कोटींची घसरण झाली आहे.
जागतिक बाजाराची स्थिती – (Stock Market)
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई २२५, चीनचा शांघाय एसएसई कॉम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरणीसह बंद झाले. कोस्पीमध्ये ४.५२ टक्के, तर निक्केईमध्ये १.८९ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. युरोपीय बाजारांमध्येही व्यवहारादरम्यान नकारात्मक कल दिसून आला. अमेरिकेतील बाजार मंगळवारी बहुतांश घसरणीसह बंद झाले होते.
शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी ४,५६६.०३ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
तज्ज्ञांचे मत –
‘एनरिच मनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर. यांनी सांगितले की, अमेरिका-इराणमधील नव्या संघर्षामुळे मध्य पूर्वेतील परिस्थितीबाबतची अनिश्चितता पुन्हा वाढली असून, त्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या जोखीम घेण्याच्या मानसिकतेवर झाला आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात सकारात्मक व्यवहार झाल्यानंतरही नंतर बाजाराने वाढ गमावली.
दरम्यान, जागतिक तेलाचा निर्देशांक मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूडच्या किमतीत ०.२० टक्क्यांची घसरण होऊन तो प्रति बॅरल ९१.२७ डॉलरवर व्यवहार करत होता.
मंगळवारी सेन्सेक्स ३९४.५० अंकांनी अर्थात ०.५४ टक्क्यांनी वधारून ७३,९१८.७६ वर, तर निफ्टी ११९.१० अंकांनी अर्थात ०.५२ टक्क्यांनी वाढून २३,२४२.१० वर बंद झाला होता.





