Stock Market: जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण, अमेरिका-इराण चर्चेबाबत निर्माण झालेला आशावाद आणि बँकिंग क्षेत्रातील जोरदार खरेदी यांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेअर बाजाराने शुक्रवारी उसळी घेतली. बीएसई सेन्सेक्स 231.99 अंकांनी वाढून 75,415.35 वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 64.60 अंकांनी वधारत 23,719.30 वर स्थिरावला. हे शेअर्स वाढीसह बंद – (Stock Market) दिवसभरात सेन्सेक्सने 627 अंकांची झेप घेत 75,810.97 हा उच्चांक गाठला होता. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला. सेन्सेक्समधील ट्रेंट, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स वाढीसह बंद झाले. तर सन फार्मा, आयटीसी, पॉवर ग्रिड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, “मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याच्या अपेक्षेमुळे जागतिक बाजारात सकारात्मकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील गुंतवणूक हा जागतिक बाजारातील प्रमुख आधार राहिला असून देशांतर्गत बाजारात वित्तीय क्षेत्राने आघाडी घेतली.” आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक वाढीसह बंद झाले. युरोपीय बाजारातही सकारात्मक वातावरण होते. अमेरिकन बाजार गुरुवारी वाढीसह बंद झाले होते. (Stock Market) दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी 1,891.21 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. रुपयातही सलग दुसऱ्या दिवशी मजबुती – (Stock Market) कच्च्या तेलाच्या किंमतीतील नरमाई, डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणा आणि रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाच्या शक्यतेमुळे रुपयानेही शुक्रवारी जोरदार पुनरागमन केले. रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 63 पैशांनी मजबूत होत 95.73 वर (तात्पुरता) बंद झाला. आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपयाची सुरुवात 96.30 वर झाली होती. दिवसात त्याने 95.30 हा उच्चांक आणि 95.68 हा नीचांक गाठला. गुरुवारी रुपया 96.36 वर बंद झाला होता. सकारात्मक संकेतांमुळे चलन बाजाराला दिलासा – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या इराणविषयक चर्चांबाबतच्या सकारात्मक संकेतांमुळे चलन बाजाराला दिलासा मिळाल्याचे फॉरेक्स विश्लेषकांनी सांगितले. अमेरिकन ट्रेझरी बाँड उत्पन्नात घट आणि देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीमुळेही रुपयाला पाठबळ मिळाले. (Stock Market) मिराए अॅसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले की, “अमेरिका-इराण तणावामुळे रुपयावर दबाव कायम राहू शकतो. मात्र शांतता चर्चांबाबतचा आशावाद आणि कच्च्या तेलाच्या किंमतीतील नरमाई रुपयाला आधार देऊ शकते.” डीएसपी म्युच्युअल फंडचे साहिल कपूर यांनी संशोधन अहवालात “रुपया-आधारित मालमत्तांमध्ये गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे,” असे मत व्यक्त केले. दरम्यान, जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूड 2 टक्क्यांहून अधिक वाढून प्रति बॅरल 104 डॉलरच्या पुढे व्यवहार करत होता.