Stock Market : तेलाचे दर घसरल्याने शेअर बाजाराची चौथ्या दिवशीही मुसंडी; सेन्सेक्स 347 अंकांनी वधारला
Stock Market : दिवसभरातील व्यवहारात बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स 410.51 अंकांनी उसळी घेत 77,218.99 या उच्चांकापर्यंत पोहोचला होता. त्याचप्रमाणे एनएसईचा 50 समभागांचा निफ्टी 119.05 अंकांनी वाढून 24,108.20 या पातळीवर गेला होता.

Stock Market : अमेरिका-इराण शांतता करारानंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आलेल्या नरमाईमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहिला असून भारतीय शेअर बाजाराने सलग चौथ्या सत्रात तेजीची वाटचाल सुरू ठेवली. बुधवारी सेन्सेक्स 347.14 अंकांनी वधारत 77,155.62 वर, तर निफ्टी 96.55 अंकांच्या वाढीसह 24,085.70 वर बंद झाला.
दिवसभरातील व्यवहारात बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स 410.51 अंकांनी उसळी घेत 77,218.99 या उच्चांकापर्यंत पोहोचला होता. त्याचप्रमाणे एनएसईचा 50 समभागांचा निफ्टी 119.05 अंकांनी वाढून 24,108.20 या पातळीवर गेला होता.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹३.५० लाख कोटींची वाढ – (Stock Market)
एक व्यावसायिक दिवसापूर्वी म्हणजेच १६ जून २०२६ रोजी ‘बीएसई’वर (BSE) लिस्टेड असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ₹४,७१,६८,५६५.०५ कोटी होते. आज म्हणजेच १७ जून २०२६ रोजी ते उसळी घेत ₹४,७५,१७,४८२.५७ कोटींवर पोहोचले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात ₹३,४८,९१७.५२ कोटींची भर पडली आहे.

Stock Market : तेलाचे दर घसरल्याने शेअर बाजाराची चौथ्या दिवशीही मुसंडी; सेन्सेक्स 347 अंकांनी वधारला
सेन्सेक्समधील समभागांमध्ये ट्रेंटचा सर्वाधिक 7.06 टक्क्यांनी वाढ झाली. याशिवाय भारत इलेक्ट्रॉनिक्स, इटर्नल, टाटा स्टील, इन्फोसिस, टायटन आणि भारती एअरटेल या समभागांनाही चांगली मागणी राहिली. दुसरीकडे, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.
तज्ज्ञांचे मत –
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल सुमारे 79.10 डॉलरवर व्यवहार करत होता. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील भू-राजकीय तणाव कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतींवरील दबाव कमी झाला असून त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून येत असल्याचे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय निर्देशांक वाढीसह बंद झाले, तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरला. युरोपीय बाजारांमध्ये संमिश्र चित्र दिसून आले. अमेरिकेचे बाजार मात्र मंगळवारी बहुतांश घसरणीसह बंद झाले होते.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी 749.18 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याची माहिती शेअर बाजाराच्या आकडेवारीतून समोर आली.
यापूर्वी मंगळवारी सेन्सेक्स 544.15 अंकांनी, तर निफ्टी 135.25 अंकांनी वधारला होता. त्यामुळे बाजारातील तेजीचा सलग चौथा दिवस नोंदविला गेला.
डॉलरच्या तुलनेत रुपयात १० पैशांची घसरण टळली; ९४.५० वर बंद –
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आज १० पैशांनी मजबूत होत ९४.५० वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल ७९ डॉलरच्या खाली घसरल्याने आणि डॉलर इंडेक्स मऊ झाल्याने रुपयाला बळ मिळाले. अमेरिका आणि इराणमधील शांतता करारामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे ही सुधारणा झाली आहे.
दिवसभरात रुपयाने ९४.२९ ते ९४.६० दरम्यान व्यवहार केला. शेअर बाजारातील तेजीनेही गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला; आज सेन्सेक्स ३४७ अंकांनी तर निफ्टी ९६ अंकांनी वधारला. ‘मिराई अॅसेट शेअरखान’च्या विश्लेषकांनुसार, कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींमुळे आगामी काळातही रुपयाची स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे.





