Stock market : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत असूनही ब्ल्यू-चिप शेअर्समधील नफावसुलीमुळे गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या चढ-उतारानंतर घसरण नोंदविण्यात आली. बीएसई सेन्सेक्स १३५.०३ अंकांनी घसरून ७५,१८३.३६ अंकांवर बंद झाला, तर निफ्टीत ४.३० अंकांची किरकोळ घसरण होऊन तो २३,६५४.७० अंकांवर स्थिरावला. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने ७५,९४५.७९ अंकांचा उच्चांक गाठला, तर ७४,९९६.७८ अंकांपर्यंत घसरण झाली. अशाप्रकारे निर्देशांकात तब्बल ९४९ अंकांची चढ-उताराची नोंद झाली. कोणते शेअर वाढले – (Stock market) सेन्सेक्समधील प्रमुख घसरणाऱ्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह आणि भारती एअरटेल यांचा समावेश होता. दुसरीकडे इंटरग्लोब एव्हिएशन, ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि अदानी पोर्ट्स या समभागांनी वाढ नोंदविली. ‘लाइफलाँग वेल्थ’चे संस्थापक आणि संशोधन विश्लेषक हरिप्रसाद के. यांनी सांगितले की, “सकारात्मक जागतिक संकेत आणि देशांतर्गत आर्थिक चिंतेमुळे बाजारात अस्थिर वातावरण निर्माण झाले. उच्च पातळीवरील प्रतिकारामुळे सुरुवातीची तेजी टिकू शकली नाही.” आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत ०.७१ टक्क्यांची घसरण होऊन ते प्रति बॅरल १०४.३ डॉलरवर आले. विदेशी बाजारांची स्थिती – (Stock market) आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्केई निर्देशांक वाढीसह बंद झाले. कोस्पीमध्ये आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मात्र, चीनचा शांघाय एसएसई कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरणीसह बंद झाले. दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी १,५९७.३५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याची माहिती शेअर बाजारांकडून देण्यात आली. रुपयात डॉलरच्या तुलनेत ४९ पैशांनी सुधारणा – कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण, भू-राजकीय तणाव कमी होण्याची चिन्हे आणि रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य हस्तक्षेपामुळे रुपयाने गुरुवारी जोरदार पुनरागमन केले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४९ पैशांनी मजबूत होत ९६.३७ वर बंद झाला. बुधवारी रुपया ९६.९५ या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला होता. आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपया दिवसाच्या व्यवहारात ९६.०५ ते ९६.६० या दरम्यान राहिला. तज्ज्ञांच्या मते, आगामी आरबीआय पतधोरण आढावा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, ब्रेंट क्रूड १०४.२३ डॉलर प्रति बॅरलवर घसरले. (Stock market)