Stock market: जागतिक राजकारणातील वाढती अनिश्चितता आणि परकीय गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या समभागांच्या विक्रीमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११४ अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये किरकोळ घसरण झाली. गुरुवारी सकाळपासूनच बाजारात चढ-उताराचे सत्र सुरू होते. बाजार बंद होताना ३० शेअर्सवर आधारित सेन्सेक्स ०.१५ टक्क्यांच्या घसरणीसह ७७,८४४.५२ अंकांवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ७८,३८४.७० ही उच्चांकी आणि ७७,७१३.२१ ही निचांकी पातळी स्पर्श केली. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी अवघ्या ४.३० अंकांनी घसरून २४,३२६.६५ वर बंद झाला. कोणते शेअर्स वाढले, कोणते घसरले ? सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांपैकी हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, टेक महिंद्रा, टायटन, सन फार्मा आणि आयटीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. याउलट महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक आणि टाटा स्टील यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजार अधिक कोसळण्यापासून वाचला. बाजार तज्ज्ञांच्या मते, सध्या अमेरिकेच्या शांतता प्रस्तावावर इराण काय भूमिका घेते, याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या भू-राजकीय तणावामुळे आणि बुधवारी परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेल्या सुमारे ५,८३४ कोटी रुपयांच्या विक्रीमुळे बाजारात सावधगिरीचे वातावरण आहे. दरम्यान, जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत २.२३ टक्क्यांची घट होऊन ते ९९ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. आशियाई बाजारात तेजी असली तरी युरोपीय बाजारातील कमकुवत स्थितीचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला.