Stock market: कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयाची विक्रमी घसरण आणि इंधनदरवाढीमुळे वाढलेल्या महागाईच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने शेअर बाजाराने शुक्रवारी सुरुवातीची तेजी गमावत घसरणीसह व्यवहार संपविला. धातू, तेल-गॅस आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. मुंबई शेअर (Stock market) बाजाराचा सेन्सेक्स दिवसअखेर १६०.७३ अंकांनी अर्थात ०.२१ टक्क्यांनी घसरून ७५,२३७.९९ अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने सुरुवातीला सुमारे ४७० अंकांची उसळी घेतली होती; मात्र नंतर नफा वसुलीमुळे तो घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४६.१० अंकांनी म्हणजेच ०.१९ टक्क्यांनी घसरून २३,६४३.५० अंकांवर स्थिरावला. सलग दोन दिवसांची तेजीही यामुळे खंडित झाली. (Stock market) बाजार बंद होताना बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल घटून ४,६०,५५,३८४.९८ कोटी रुपयांवर आले. गुरुवारी हेच बाजार भांडवल ४,६२,२२,८६५.०६१ कोटी रुपये होते. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १,६७,४८०.०८१ कोटी रुपयांची घट झाली. कोणते शेअर्स घसरले कोणते वधारले ? (Stock market) सेन्सेक्समधील टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन अँड टुब्रो, ट्रेंट, अॅक्सिस बँक आणि एशियन पेंट्स या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरले. दुसरीकडे इन्फोसिस, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड, अदानी पोर्ट्स, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि सन फार्मा यांचे समभाग वधारले. तज्ज्ञांचे मत – जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, “अलीकडील तेजीच्या पार्श्वभूमीवर वाढते रोखे उत्पन्न, कमकुवत होत चाललेला रुपया आणि इंधनदरवाढ यामुळे महागाईबाबतची चिंता पुन्हा वाढली असून गुंतवणूकदार सावध झाले आहेत.” चौथ्या तिमाहीतील चांगले निकाल आणि आकर्षक मूल्यांकनामुळे बाजारातील घसरण मर्यादित राहिल्याचेही त्यांनी नमूद केले. रुपया ९६ च्या खाली घसरला – दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी प्रथमच ९६ च्या खाली घसरला. दिवसअखेर रुपया ९५.९४ या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. इराण युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ केली. तसेच दिल्ली आणि मुंबईसह काही शहरांत सीएनजी दरातही प्रतिकिलो २ रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. Stock market: ‘या’ कारणांमुळे शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांचे 1.67 लाख कोटी रुपयांचे नुकसान आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर ३ टक्क्यांहून अधिक वाढून प्रति बॅरल १०९.२३ डॉलरवर पोहोचला. याचबरोबर एप्रिल महिन्यात भारताची निर्यात १३.७८ टक्क्यांनी वाढून ४३.५६ अब्ज डॉलरवर गेल्याची माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली आहे. आयात १० टक्क्यांनी वाढून ७१.९४ अब्ज डॉलर झाली असून व्यापार तूट २८.३८ अब्ज डॉलर इतकी नोंदविण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारही घसरले – आशियाई बाजारांतही दबाव दिसून आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ६ टक्क्यांहून अधिक घसरला. युरोपीय बाजारही घसरणीसह व्यवहार करत होते. गुरुवारी अमेरिकन बाजार मात्र वाढीसह बंद झाले होते. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी १८७.४६ कोटी रुपयांची शेअरखरेदी केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ६८४.३३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, असे शेअर बाजाराच्या आकडेवारीतून समोर आले आहे.