Stock Market : जगभरात विक्रीचे वारे, निर्देशांक कोसळले; धातू कंपन्यांना जोरदार फटका

मुंबई – चीन आणि अमेरिकेतील काही नकारात्मक घडामोडींमुळे जगभरातील शेअर बाजारात सोमवारी विक्रीचे वार घोंगावले. त्याचा परिणाम होऊन भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. याचा धातू कंपन्यांना जबरदस्त फटका बसला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 525 अंकांनी कोसळून 58,490 अंकावर बंद झाला. सेन्सेक्ससंदर्भातील 30 कंपन्यापैकी फक्त सहा कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होऊ शकली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.06 टक्क्यांनी म्हणजे 188 अंकांनी कोसळून 17,396 अंकांवर बंद झाला.
आज धातू क्षेत्रातील टाटा स्टील कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी कोसळला. त्याचबरोबर स्टेट बॅंक, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी बॅंक, डॉक्टर रेड्डीज, महिंद्रा या कंपन्यांना विक्रीचा जबरदस्त मारा सहन करावा लागला. मात्र अशा वातावरणात हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिन्सर्व, आयटीसी, एचसीएल टेक या कंपनीच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली.
भारतीय शेअर बाजार निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध असताना जागतिक शेअर बाजारातून नकारात्मक संकेत आल्यानंतर आज जोरदार विक्री झाली.
राष्ट्रीय शेअर बाजारातील ग्राहक वस्तू क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. त्यामध्ये सरकारी बॅंक, धातू, औषधी क्षेत्राचा समावेश आहे. मुख्य निर्देशाकांकाबरोबर आज मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन टक्क्यापर्यंत कोसळले. या आठवड्यात बऱ्याच देशाच्या रिझर्व बॅंकांची बैठक होणार आहे. यापैकी काही बॅंका व्याजदरात वाढ करण्याचे संकेत देण्याची शक्यता आहे असे गुंतवणूकदारांना वाटते.
शेअर बाजारात झालेल्या विक्रीचा परिणाम रुपयाच्या मुल्यावर होऊन रुपयाचा दर 26 पैशानी कोसळून 73.74 रुपये प्रती डॉलर झाला. मात्र निर्देशांक कोसळल्यामुळे क्रुडचा दर 1.92 टक्क्यांनी कोसळून 73.89 डॉलर प्रति औंस झाला.
निर्देशांक का कोसळले
आतापर्यंतच्या संकेतानुसार अमेरिका डिसेंबरपासून व्याजदर वाढ करणे अपेक्षित होते. मात्र आता नोव्हेंबरपासूनच व्याजदर वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. या कारणामुळे जागतिक गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. त्याचबरोबर चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रातील बलाढ्य कंपनी एव्हरग्रॅंडे या कंपनीसमोर आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला असून ही कंपनी कर्ज परतफेड करू शकेल का याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे धातू क्षेत्रावर दबाव आला असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमॉडीटी व चलन विभागाचे प्रमुख नवनीत दमानी यांनी सांगितले.




