Stock Market : दिवसभरातील मोठ्या घसरणीनंतर आयटी आणि निवडक ब्ल्यू-चिप शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे शेअर बाजाराने सोमवारी अखेरीस किरकोळ वाढीसह सत्र समाप्त केले. मात्र, रुपयातील कमजोरी आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे बाजारावरील दबाव कायम राहिला. अत्यंत चढ-उताराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा ३० समभागांचा सेन्सेक्स ७७.०५ अंकांनी अर्थात ०.१० टक्क्यांनी वधारून ७५,३१५.०४ अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो तब्बल १,१३४.७८ अंकांनी घसरून ७४,१८०.२६ या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही ६.४५ अंकांच्या किरकोळ वाढीसह २३,६४९.९५ अंकांवर स्थिरावला. सर्वाधिका वाढले-घसरलेले शेअर्स – (Stock Market ) सेन्सेक्समधील समभागांमध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, एचसीएल टेक, बजाज फायनान्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी वाढ नोंदवली. दुसरीकडे, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एनटीपीसी हे समभाग घसरणीत राहिले. तज्ज्ञांचे मत – ‘अमेरिका-इराण तणाव कायम असल्याने गुंतवणूकदारांमध्ये सावध भूमिका दिसून येत आहे. तरीही आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराने दिवसअखेर तोटा भरून काढला. वाढते बाँड उत्पन्न, महागडे कच्चे तेल आणि कमकुवत रुपया यामुळे महागाईची चिंता वाढली आहे,’ असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. हेही वाचा – डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी 96.35 वर; महागाई वाढीची शक्यता जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूडची किंमत ०.७३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ११०.१ डॉलरवर पोहोचली. लिव्हलाँग वेल्थचे संशोधन विश्लेषक हरीप्रसाद के. यांनी सांगितले की, सुरुवातीच्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी निवडक समभागांमध्ये मूल्यआधारित खरेदी आणि शॉर्ट कव्हरिंग केल्याने बाजाराने जोरदार पुनरागमन केले. निफ्टी आयटी निर्देशांकात दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने आयटी क्षेत्राने बचावात्मक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून लक्ष वेधले. जागतिक बाजारात संमिश्र चित्र – (Stock Market ) आशियाई बाजारांत जपानचा निक्केई, चीनचा शांघाय एसएसई कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरणीसह बंद झाले; तर दक्षिण कोरियाचा कोस्पी वाढीसह बंद झाला. युरोपीय बाजारांत संमिश्र चित्र दिसून आले. दरम्यान, शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात १,३२९.१७ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली, अशी माहिती शेअर बाजारांकडून देण्यात आली.