Stock market : ‘या’ कारणामुळे शेअर बाजाराचे जोरदार पुनरागमन; सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद
Stock market : सोमवारी सेन्सेक्स ७१९.०८ अंकांनी घसरून ७३,५२४.२६ अंकांवर, तर निफ्टी २४३.७० अंकांनी घसरून २३,१२३ अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी झालेल्या वाढीमुळे बाजाराने या घसरणीतील काही प्रमाणात नुकसान भरून काढले.

Stock market : इस्रायल-इराण संघर्षातील तणाव काहीसा कमी झाल्याने, जागतिक बाजारांमधील सकारात्मक वातावरण आणि कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी जोरदार पुनरागमन केले. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले.
मुंबई शेअर बाजाराचा ३० समभागांचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) ३९४.५० अंकांनी म्हणजेच ०.५४ टक्क्यांनी वाढून ७३,९१८.७६ अंकांवर स्थिरावला. दिवसभरात तो ५११.१५ अंकांनी वधारून ७४,०३५.४१ अंकांपर्यंत पोहोचला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी निर्देशांक ११९.१० अंकांच्या म्हणजेच ०.५२ टक्क्यांच्या वाढीसह २३,२४२.१० अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान निफ्टीने २३,२७९.४० अंकांचा उच्चांक गाठला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹५ लाख कोटींची वाढ – (Stock market)
एक व्यावसायिक दिवसापूर्वी म्हणजेच ०८ जून २०२६ रोजी ‘बीएसई’वर (BSE) लिस्टेड असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप (बाजार भांडवल) ₹४,५४,४०,३३३.०८१ कोटी होते. आज म्हणजेच ०८ जून २०२६ रोजी ते वाढून ₹४,५९,७४,९१९.२६ कोटी झाले आहे. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात ₹५,३४,५८६.१७९ कोटींची घसघशीत वाढ झाली आहे.
कोणते शेअर्स वाढले – घसरले ? (Stock market)
सेन्सेक्समधील समभागांमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्स यांनी सर्वाधिक वाढ नोंदवली. तर टायटन, एनटीपीसी, पॉवर ग्रिड आणि टेक महिंद्रा यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर १.६६ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ९२.६९ डॉलरवर आला. कच्च्या तेलाच्या किंमतीतील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
जागतिक बाजाराची स्थिती –
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ८.१८ टक्क्यांनी, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक २.१७ टक्क्यांनी आणि चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक १.२८ टक्क्यांनी वाढला. मात्र हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक घसरणीसह बंद झाला. युरोपातील प्रमुख बाजारांमध्येही तेजीचे वातावरण होते.
तज्ज्ञांचे मत –
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, अलीकडील मोठ्या घसरणीनंतर देशांतर्गत बाजारात पुनरुज्जीवन दिसून येत आहे. इस्रायल-इराण तणावातील शिथिलता आणि तेलाच्या किंमतीतील नरमाई यामुळे बाजाराला आधार मिळाला असला, तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (एफआयआय) विक्री आणि वाढते रोखे उत्पन्न (बाँड यिल्ड) यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी कायम आहे.
एनरिच मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर. यांनी सांगितले की, भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे जोखमीच्या मालमत्तांमध्ये पुन्हा गुंतवणूक वाढली आहे. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्राबाबतचा आशावादही जागतिक बाजारांच्या तेजीला कारणीभूत ठरला.
दरम्यान, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून ५,५५५.६७ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याची माहिती शेअर बाजाराच्या आकडेवारीतून समोर आली.
उल्लेखनीय म्हणजे, सोमवारी सेन्सेक्स ७१९.०८ अंकांनी घसरून ७३,५२४.२६ अंकांवर, तर निफ्टी २४३.७० अंकांनी घसरून २३,१२३ अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी झालेल्या वाढीमुळे बाजाराने या घसरणीतील काही प्रमाणात नुकसान भरून काढले.
डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी मजबूत; ९५.३६ वर बंद –
मुंबई : पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती आणि डॉलर निर्देशांकात झालेल्या घसरणीचा फायदा भारतीय चलनाला झाला. मंगळवारी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २५ पैशांनी मजबूत होत ९५.३६ (तात्पुरता) या पातळीवर बंद झाला. आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपयाने ९५.२३ ते ९५.६७ या दरम्यान व्यवहार केला.
सकारात्मक देशांतर्गत शेअर बाजार, अमेरिकन ट्रेझरी उत्पन्नातील नरमाई आणि रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य हस्तक्षेपामुळे रुपयाला आधार मिळाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्यास कच्च्या तेलाचे दर वाढून रुपयावर दबाव येऊ शकतो, असा इशाराही विश्लेषकांनी दिला.






