Stock Market : शेअर बाजारात मोठ्या हालचाली; सेन्सेक्स 77,100; निफ्टी 24,056 वर स्थिरावला
Stock Market : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली.

Stock Market : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली. मात्र, उच्च पातळीवर गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याने दिवसअखेरीस बाजाराने सुरुवातीची बहुतांश आघाडी गमावली. अखेर बीएसई सेन्सेक्स 109.25 अंकांच्या (0.14 टक्के) किरकोळ वाढीसह 77,100.47 अंकांवर, तर एनएसई निफ्टी 34.35 अंकांच्या (0.14 टक्के) वाढीसह 24,056 अंकांवर बंद झाला.
दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने 77,803.18 अंकांचा उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर नफा वसुलीच्या दबावामुळे निर्देशांक तब्बल 700 हून अधिक अंकांनी घसरला. निफ्टीनेही 24,261.60 अंकांच्या उच्चांकावर झेप घेतल्यानंतर 200 हून अधिक अंकांची घसरण अनुभवली.
गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने सुमारे 1,700 अंकांची, तर निफ्टीने जवळपास 2 टक्क्यांची उसळी घेतली होती. त्यामुळे उच्च पातळीवर गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिले. परिणामी, दुपारनंतर बाजारातील तेजी ओसरली.
ऑटो आणि बँकिंग क्षेत्राचा आधार –
क्षेत्रनिहाय व्यवहारात वाहन आणि बँकिंग क्षेत्राने बाजाराला मोठा आधार दिला. निफ्टी ऑटो निर्देशांक 2.25 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक आघाडीवर राहिला. मदरसन, अशोक लेलँड, टीव्हीएस मोटर, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती सुझुकी या कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केली. एफएमसीजी, रिअॅल्टी, खासगी बँका आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागही वाढीसह बंद झाले.
मेटल आणि ऊर्जा क्षेत्रावर दबाव –
दुसरीकडे, धातू क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी घसरण झाली. लंडन मेटल एक्स्चेंजवरील किंमतींतील नरमाई, मजबूत डॉलर आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीची शक्यता यामुळे निफ्टी मेटल निर्देशांक 1.37 टक्क्यांनी घसरला. हिंदुस्तान झिंकच्या समभागात सलग तिसऱ्या दिवशी घसरण होत 3 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. वेदांता आणि नॅशनल अॅल्युमिनियमचे समभागही सुमारे 3 टक्क्यांनी घसरले.
कच्च्या तेलाच्या किमती युद्धपूर्व पातळीवर आल्याने सरकारी तेल उत्पादक कंपन्यांवर दबाव दिसून आला. ओएनजीसीचा समभाग 2 टक्क्यांनी घसरत निफ्टीतील सर्वाधिक तोट्यातील समभाग ठरला. ऑइल इंडिया, कोल इंडिया आणि पॉवर ग्रिडमध्येही 2 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
इंडिगो, एम-अँड-एम तेजीत; पॉवर ग्रिड घसरला –
सेन्सेक्समधील समभागांमध्ये इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) 4.82 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल ठरला. त्यापाठोपाठ महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांमध्ये वाढ झाली. तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टेक महिंद्रा, बीईएल, इन्फोसिस आणि भारती एअरटेल हे समभाग घसरणीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ₹75 हजार कोटींची घट –
मुख्य निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले असले तरी व्यापक बाजारावर दबाव कायम राहिला. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.55 टक्के, तर निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.47 टक्क्यांनी घसरला.
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल एका दिवसात ₹75,428.88 कोटींनी घटले. 24 जून रोजी बाजार भांडवल ₹4,75,91,553.93 कोटी होते, ते गुरुवारी ₹4,75,16,125.05 कोटींवर आले.
बीएसईवर व्यवहार झालेल्या 4,406 समभागांपैकी 1,641 समभाग वधारले, 2,581 समभाग घसरले, तर 184 समभागांमध्ये कोणताही बदल झाला नाही. याशिवाय, 148 समभागांनी वर्षातील उच्चांक गाठला, तर 58 समभाग वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले.





