Stock Market: शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला

मुंबई – महागाई वाढत असल्यामुळे बहुतांश देशांच्या रिझर्व बॅंका महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. या कारणामुळे भांडवलाचा वापर कमी होईल या शक्यतेमुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला आहे. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांकही गेल्या तीन दिवसापासून घसरत आहेत.
गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 634 अंकांनी कोसळून 59,464 अंकांवर बंद झाला. विक्रीचा जोर इतका होता की, सेन्सेक्ससंबंधातील 30 पैकी 23 कंपन्याच्या शेअरच्या भावात घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 181 अंकांनी म्हणजे 1.01 टक्क्यांनी कोसळून 17,757 अंकांवर बंद झाला.
बजाज फिन्सर्व कंपनीचा शेअर 4.57 टक्क्यांनी कोसळला. त्याचबरोबर ईन्फोसीस, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज, रिलायन्स या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. मात्र या विक्रीच्या वातावरणातही पावर ग्रिड, एयरटेल, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली.
युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक सकाळी मोठ्या प्रमाणात कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही विक्रीचा जोर कायम राहिला असे विश्लेषकांनी सांगितले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 2,407 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. अमेरिकेच्या व्याजदर वाढीमुळे हे गुंतवणूकदार भारतातून परत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरीकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे रोख्यातील गुंतवणूक आकर्षक होणार आहे. या गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात 28 टक्के इतकी गुंतवणूक आहे. या गुंतवणूकदारांनी विक्री चालू ठेवल्यानंतर निर्देशांकावर परिणाम रेंगाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. माहीती तंत्रज्ञान, उर्जा, आरोग्य, या क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची विक्री झाली. तर धातू क्षेत्र आज तेजीत होते.




