Stock Market: इराण – अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले होते. अशा परिस्थितीत बर्याच कंपन्यांचे शेअर सध्या 52 आठवड्याच्या निचांकी पातळीवर आहेत. आता निर्देशांक घसरणार नाहीत असे समजणार्या गुंतवणूकदारांनी दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे सलग तिसर्या दिवशी बाजाराचे निर्देशांक वाढण्यास मदत झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 633 अंकांनी म्हणजे 0.83 टक्क्यांनी वाढून 76,704 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 196 अंकांनी वाढून 23,777 अंकावर बंद झाला. सेन्सेक्स संदर्भातील इटर्नल, टेक महिंद्रा, इन्फोसिस, महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजी, अदानी पोर्टस्, टीसीएस, अॅॅक्सिस बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. दरम्यानच्या काळामध्ये खनिज तेलाचे दर किंचित कमी पातळीवर गेले आहेत. त्याचबरोबर जागतिक शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आले. दक्षिण कोरियाचा निर्देशांक पाच टक्क्यांनी वाढला. जपान, शान्घाय, हाँगकाँग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. जगभरातील गुंतवणूकदारात आशावाद परतला आहे. युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्यामुळे भारतातील गुंतवणूकदारांनी सध्याच्या अनिश्चित परिस्थितीत गुंतवणूक करण्याचे धाडस केले. जियोजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की माहिती तंत्रज्ञान, रिअॅल्टी, वाहन क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. गुंतवणूकदार आता आखातातील तणाव लवकरच निवळेल याबाबत आशावादी झाले आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी 4,741 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर निर्देशांकांना पडत्या काळात आधार देणार्या देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 5,225 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. शेअर बाजारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार 3,202 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. 1,088 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. धातू क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात कमी अधिक प्रमाणात वाढ झाली. मात्र ही तेजी दीर्घकाळ टिकणारी नाही. मध्यपूर्वेत अचानक परिस्थिती बिघडल्यानंतर पुन्हा सावध गुंतवणूकदाराकडून विक्रीचा मारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारानी अतिशय सावध राहून व्यवहार करण्याची गरज असल्याचे मत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसेस या कंपनीचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी व्यक्त केले. क्षेत्र वाढ मिडकॅप 2.39% स्मॉल कॅप 1.59% आयटी 2.82% रिअॅल्टी 2.67% सेवा 2.45% दूरसंचार 2.44% ग्राहक वस्तू 2.08%