Stock Market: विक्रीचे वातावरण कायम; शेअर निर्देशांकात सलग दुसऱ्या दिवशी माफक घट

मुंबई – देशातील व परदेशातील नकारात्मक परिस्थितीमुळे शेअर बाजाराता विक्रीचे वारे कायम आहे. क्रूडच्या किमती एकतर्फी वाढू लागल्या आहेत. त्याचबरोबर परकीय गुंतवणूकदाराकडून विक्री चालू असल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात घट झाली असल्याचे दिसून आले.
सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 93 अंकांनी घसरून 55,675 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 14 अंकांनी घसरून 16,569 अंकांवर बंद झाला. आज शेअर बाजारात फक्त बॅंकिंग, वाहन, धातू, तेल आणि वायू क्षेत्रांमध्ये वाढ दिसली. तर दुसरीकडे, आयटी, एफएमसीजी, फार्मा, ऊर्जा, मीडियासह इतर सर्व क्षेत्रे घसरणीसह बंद झाली. निफ्टीच्या 50 शेअर्समधील 28 शेअरमध्ये आज घसरण झाली. तर 22 शेअर्समध्ये वाढ झाली.
काही कंपन्याच्या शेअरच्या भावाता वाढ झाली. स्टील 0.99 टक्के, इंडसइंड बॅंक 0.78 टक्के, महिंद्रा 0.77 टक्के, आयटीसी 0.70 टक्के, कोटक महिंद्रा 0.67 टक्के, इन्फोसिस 0.55 टक्के, आयसीआयसीआय बॅंक 0.44 टक्के, एनटीपीसी 0.06 टक्के, मारुती सुझुकीचा शअर 0.50 टक्क्यानी वाढला. तर अल्ट्राटेक सिमेंट 1.69 टक्क्यानी कमी झाला. बजाज फिनसर्व्ह 1.34 टक्के, नेले 1.01 टक्के, लार्सन 0.79 टक्के, ऍक्सिस बॅंक 0.68 टक्के, सन फार्मा 0.63 टक्के, डॉ. रेड्डी 0.59 टक्के, एचयूएल 0.59 टक्के. , विप्रो 0.52 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
आनंद राठी शअर्स अँड स्ट्रॉक ब्रोकर्स या संस्थेचे विश्लेषक नरेंद्र सोळंके यांनी सांगितले की रिझर्व बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक चालू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पतधोरणाकडे लक्ष आहे. पतधोरण जाहीर झाल्यानंतर निर्देशाकांना काही प्रमाणात दिशा मिळू शकेल. मोठ्या कंपन्यांबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरची विक्री चालू असून सोमवारी मिड कॅप 0.15 टक्क्यांनी तर स्माल कॅप 0.5 टक्क्यांनी कमी झाला.
भारतीय रिझर्व बॅंकेबरोबरच युरोपियन आणि अमेरिकेच्या रिझर्व बॅंकांची बैठक या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे शेअर बाजारांमध्ये संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा कायम ठेवला असून शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 3,770 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.




