Stock Market : निर्देशांकांची झीज भरून निघाली

मुंबई  – चीन मधील बलाढ्य एव्हरग्रॅंडे ही कंपनी कर्ज परतफेड करू शकेल की नाही याबाबत शंका निर्माण झाल्यानंतर काल जागतिक शेअर बाजारात पडझड झाली होती. मात्र परिस्थिती तितकीशी खराब नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर आज शेअर बाजाराचे निर्देशांकात सावरून पूर्वपदावर आले.

मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 514 अंकांनी वाढून 59,005 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 165 अंकांनी वाढून 17,562 अंकांवर बंद झाला.

रिऍल्टी, धातू, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये तीन टक्‍क्‍यापर्यंत वाढ नोंदली गेली. मात्र वाहन, बॅंकींग या क्षेत्राची विक्रीमुळे बरीच हानी झाली. मिड कॅप आणि स्मॉलकॅप 0.79 टक्के पर्यंत वाढले.

दरम्यान जागतिक संस्थागत गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातील खरेदी चालूच आहे. काल या गुंतवणूकदारांनी निर्देशांक कोसळूनही 92 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी उपलब्ध केली. बजाज फायनान्स, इंडसइंड बॅंक, आयटीसी, बजाज फिन्सर्व, इन्फोसिस या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले. तर मारुती, बजाज ऑटो, नेस्ले, एचडीएफसी बॅंक, पॉवर ग्रिड, ऍक्‍सिस बॅंकेला विक्रीचा मारा सहन करावा लागला.

फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाकडे लक्ष्य
निर्देशांकाच्या दृष्टिकोनातून गुरुवार महत्त्वाचा वार ठरणार आहे. चीनच्या एव्हरग्रॅंडे या बलाढ्य कंपनीला गुरुवारी 83 दशलक्ष डॉलरचे व्याज द्यायचे आहे. ही कंपनी व्याज देऊ शकेल का याबाबत शंका आहेत. जर या कंपनीने व्याजाची रक्कम दिली नाही तर चीनमधील शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो. त्याचे धक्के जागतिक शेअर बाजारांना बसू शकतात. त्याचबरोबर मंगळवारी अमेरिकेच्या फेडरल रिझर्वची बैठक चालू झाली असून दोन दिवसानंतर बैठकीचे इतिवृत्त बाहेर येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.