मुंबई: सोमवार, १५ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात दोन दिवसांची तेजी थांबली. बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला, पण दिवसाच्या नीचांकी पातळीवरून तो सावरला. विशेष म्हणजे, आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ₹६६,००० कोटींची वाढ झाली. आज बीएसई सेन्सेक्स ५४.३० अंकांनी (०.०६%) घसरून ८५,२१३ वर बंद झाला. निफ्टी १९.६५ अंकांनी (०.०८%) खाली येऊन २६,०२७ च्या पातळीवर स्थिरावला. अमेरिकेच्या बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि निवडक क्षेत्रातील मूल्याधारित खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला. प्रमुख निर्देशांक घसरले असले तरी, ब्रॉडर मार्केटमध्ये मात्र हिरवळ दिसली. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.१६% नी वाढला. स्मॉलकॅप निर्देशांक ०.४१% नी वधारला. आजच्या व्यवहारात एफएमसीजी, आयटी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. निफ्टी बँक निर्देशांकही ७२ अंकांनी वधारून ६०,२१३ वर पोहोचला. दुसरीकडे, टेलिकॉम आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalization) वाढून ₹४७०.९५ लाख कोटी झाले. मागील दिवसाच्या ₹४७०.२९ लाख कोटींच्या तुलनेत, आज सुमारे ₹६६,००० कोटींनी वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत लक्षणीय भर पडली. सेन्सेक्समधील ३० पैकी १४ शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) सर्वाधिक १.३७% नी वधारला. तर, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) १.९२% घसरणीसह टॉप लूझर्स ठरला. आज बीएसईवर एकूण ४,४४९ शेअर्समध्ये व्यवहार झाले, त्यापैकी २,२३९ शेअर्स तेजीसह, तर २,०३१ शेअर्स घसरणीसह बंद झाले.