Stock Market : फेडच्या निर्णयानंतर शेअर बाजार सपाट; NSE IPO चर्चेत, गुंतवणूकदारांची संपत्ती ₹1.87 लाख कोटींनी वाढली
Stock Market : सेन्सेक्स 74,314 आणि निफ्टी 23,270 अंकांवर बंद. NSE IPO ला पहिल्याच दिवशी 39% प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांची संपत्ती ₹1.87 लाख कोटींनी वाढली.

Stock Market : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ केल्यानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात सावध वातावरण राहिले. दिवसाच्या सुरुवातीला तेजी दिसली; मात्र व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स जवळपास स्थिर राहिला.
बीएसई सेन्सेक्स 21.86 अंकांनी घसरून 74,314.59 अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो 341 अंकांनी वाढून 74,677.56 अंकांवर पोहोचला होता. निफ्टी 53 अंकांनी वाढून 23,270.60 अंकांवर बंद झाला.
एचडीएफसी बँक, टायटन, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये दबाव राहिला. टाटा स्टील, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इंडिगो, एटरनल, मारुती आणि एशियन पेंट्समध्ये तेजी दिसली.
दरम्यान, ₹22,569 कोटींचा एनएसईचा आयपीओ गुरुवारी खुला झाला. पहिल्याच दिवशी आतापर्यंत या इश्यूला 39 टक्के प्रतिसाद मिळाला.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी भारतीय शेअर बाजारातून ₹2,032.61 कोटींचे शेअर्स विकले. कच्च्या तेलाच्या किमतीतही घट झाली असून ब्रेंट क्रूड 1.61 टक्क्यांनी घसरून 104.10 डॉलर प्रति बॅरलवर आले.
दरम्यान, बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 16 सप्टेंबरच्या ₹4,74,23,712 कोटींवरून 17 सप्टेंबरला ₹4,76,10,906.37 कोटी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ₹1.87 लाख कोटींची वाढ झाली आहे.




