Share Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी; गुंतवणूकदारांची एकाच दिवसात 6 लाख कोटींची कमाई
Share Market Today: व्यापार कराराच्या सकारात्मक बातम्या आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना आज मालामाल केले आहे.

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सलग दुसऱ्या सत्रात बाजाराने तेजी नोंदवली. सेन्सेक्स ४८५ अंकांच्या वाढीसह ८४,००० च्या पार बंद झाला, तर निफ्टीने २५,८५० चा महत्त्वपूर्ण स्तर ओलांडला.
भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराच्या (Trade Deal) वृत्ताने बाजारात उत्साह निर्माण झाला असून, यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ५.८८ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीने २५,९२२.२५ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र, नफावसुलीमुळे बाजार किंचित खाली आला. तरीही बंद होताना निफ्टी १७३.६० अंकांच्या (०.६८%) वाढीसह २५,८६७.३० वर स्थिरावला. दुसरीकडे, बीएसई सेन्सेक्स ४८५.३५ अंकांच्या (०.५८%) मजबुतीसह ८४,०६५.७५ वर बंद झाला.
तेजीची मुख्य कारणे –
भारत-अमेरिका ट्रेड डीलनुसार अनेक भारतीय उत्पादनांवरील टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. याचा सकारात्मक परिणाम बाजारावर झाला. जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला. तसेच केवळ मोठ्या कंपन्याच नव्हे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी खरेदी पाहायला मिळाली.
सेक्टरनुसार कामगिरी –
आज बाजारात सर्वच क्षेत्रांतील निर्देशांकांमध्ये हिरवळ होती. विशेषतः मीडिया, रियल्टी, पीएसयू बँक, फार्मा आणि मेटल क्षेत्रात १ ते ३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. मिडकॅप इंडेक्स १.६ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप इंडेक्स २.६ टक्क्यांनी वधारला.
सर्वाधिक नफा मिळवणारे शेअर्स (Sensex Top Gainers): एसबीआय (SBI) ७.४६% , टायटन (Titan) २.७८%, टाटा स्टील (Tata Steel) २.४५% , तर अल्ट्राटेक सिमेंट २.१५% वधारला.
घसरण झालेले शेअर्स (Top Losers): पॉवरग्रिड (१.११%), आयटीसी, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसच्या शेअरमध्ये आज काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली.
दरम्यान, BSE वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Cap) ४६७.३१ लाख कोटींवरून वाढून ४७३.१९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आज एकूण ४,५२७ शेअर्समध्ये व्यवहार झाले, ज्यापैकी ३,१०४ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १,२५६ शेअर्समध्ये घसरण झाली. विशेष म्हणजे, १४८ शेअर्सनी आज आपला ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. व्यापार कराराच्या सकारात्मक बातम्या आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना आज मालामाल केले आहे.






