Stock Market: भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सुरुवातीच्या सत्रात काही प्रमाणात घसरण झाल्यानंतर, सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार मुसंडी मारत दिवसाच्या उच्चांकी स्तरावर झेप घेतली. गुरुवार, २९ जानेवारी रोजी विदेशी गुंतवणूकदारांची पुन्हा झालेली एन्ट्री आणि अमेरिका-भारत व्यापार कराराच्या सकारात्मक चर्चांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२१.६९ अंकांनी (०.२७%) वधारून ८२,५६६.३७ वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७६.१५ अंकांनी (०.३०%) वधारून २५,४१८.९० च्या पातळीवर स्थिरावला. विशेष म्हणजे, आज दिवसाच्या नीचांकी स्तरावरून सेन्सेक्सने तब्बल ८५० अंकांची रिकव्हरी दाखवली. वरील चित्रात तुम्ही उर्वरित सेन्सेक्स समभागांची कामगिरी पाहू शकता. गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली – बाजार वधारल्यामुळे बीएसई (BSE) मध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४५९.७६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील सत्रात हे भांडवल ४५९.५३ लाख कोटी रुपये होते. परिणामी, आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २३,००० कोटी रुपयांची भर पडली आहे. तेजीची प्रमुख कारणे – परकीय गुंतवणूकदारांची खरेदी: गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने विक्री करणाऱ्या परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) बुधवारी खरेदीचा पवित्रा घेतल्याने बाजाराला बळ मिळाले. व्यापार कराराची आशा: आर्थिक पाहणी अहवालात यावर्षी अमेरिकेसोबतचा व्यापार करार (Trade Deal) पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने बाजारात सकारात्मक संकेत गेले. क्षेत्रनिहाय चढ-उतार – आज बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. फायद्यात राहिलेली क्षेत्रे: मेटल, पॉवर, ऑईल अँड गॅस आणि कमोडिटी निर्देशांकात १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. घसरण झालेली क्षेत्रे: आयटी, एफएमसीजी (FMCG), फार्मा आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्समध्ये आज विक्रीचा दबाव दिसून आला. टॉप गेनर्स आणि लूझर्स – टॉप ५ गेनर्स (तेजी) वाढ (%) टॉप ५ लूझर्स (घसरण) घसरण (%) टाटा स्टील ४.४१% एशियन पेंट्स ३.७१% लार्सन अँड टुब्रो ३.६६% इंडिगो २.६५% ॲक्सिस बँक ३.४०% मारुती सुझुकी २.१५% इटरनल ३.१०% भारत इलेक्ट्रॉनिक्स १.९५% एनटीपीसी २.८४% महिंद्रा अँड महिंद्रा १.८३% बाजाराची एकूण आकडेवारी – आज एकूण ४,३८९ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,७०२ शेअर्स वधारले, तर २,५३४ शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. १५३ शेअर्स स्थिर राहिले. विशेष म्हणजे, १०७ शेअर्सनी आज आपला ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर २७३ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले.