Stock Market: सरलेल्या आठवड्यात शेअर बाजारात बर्यापैकी खरेदी झाली होती. मात्र दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलावर अचानक हल्ला केला आहे. त्याचबरोबर भारताविरोधात आणखी आयात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत ब्यूचीप कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांनी आज सपाटून मार खाल्ला. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची पीछेहाट झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 322 अंकांनी कमी होऊन 85,439 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 78 अंकांनी म्हणजे 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 26,250 अंकावर बंद झाला. सेन्सेक्ससंदर्भातील इन्फोसिस, बजाज फायनान्स, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्याच्या शेअरच्या भावात झट झाली. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान युनिलव्हर, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीच्या शेअरच्या भावात थोडी फार वाढ झाली. गेल्या आठवड्यात निफ्टी ऐतिहासिक उच्चांकाजवळ गेला होता. मात्र सोमवारी नफेखोरी वाढल्यामुळे हा निर्देशांक बराच कमी झाला. आशीका इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या संस्थेने जारी केलेल्या टिपणात म्हटले आहे की, रशिया युक्रेन युद्ध संपले नसतानाच अमेरिका – व्हेनेझुएलादरम्यान तणाव निर्माण झाला आहे. त्याचबरोबर भारताविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट वक्तव्य केले असल्यामुळे गुंतवणूकदार बचावात्मक पवित्रा घेऊन नफेखोरी करीत आहेत. अपवादात्मक बाब म्हणून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 289 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. शुक्रवारी शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. शुक्रवारी देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 677 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. निर्देशांक आता उभारी घेत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेले नकारात्मक वातावरण लवकर संपुष्टात येण्याची शक्यता कमी असल्याचे समजले जाते. जागतिक शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण होते. मात्र ट्रम्प यांनी भारताविरुद्ध केल्यामुळे वक्तव्यामुळे भारतीय शेअर बाजारचे निर्देशांक कमी झाले. डॉलर इतर चलनाच्या तुलनेत बळकट होत आहे. त्याचबरोबर रुपया घसरत आहे.