Stock Market: सरलेल्या आठवड्यात निर्देशांक कोसळले 2.5 टक्क्यांनी

मुंबई – देशातील आणि परदेशातील अनेक नकारात्मक घटनामुळे सरलेल्या आठवड्यात शेअर बाजारात खरेदीपेक्षा विक्री जास्त झाली. परिणामी या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेक्सेक्स 1,906 अंकांनी म्हणजे 2.39 टक्क्यांनी कोसळून 77,580 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 615 अंकांनी म्हणजे 2.5 टक्क्यांनी कोसळून 23,532 अंकावर बंद झाला.
या आठवड्यात मुख्य निर्देशांकापेक्षा मिडकॅपची जास्त हानी झाली. मिडकॅप या आठवड्यात चार टक्क्यांनी कमी झाला. व्हर्लपूल, रिलॅक्स फुटवेअर, ट्यूब इन्वेस्टमेंट, थ्री एम इंडिया, राजेश एक्सपोर्ट्स, युको बँक, कमिन्स इंडिया, टाटा एलेक्सी, इंद्रप्रस्थ गॅस, स्टोरेज पावर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात आठ ते बारा टक्क्यांनी घट झाली. या आठवड्यात समॉल कॅप 4.6 टक्क्यांनी कोसळला. याचा परिणाम बीएएसएफ इंडिया, आयआयएफएल सिक्युरिटीज, विष्णू केमिकल्स, इन्फो सिस्टम्स, रोटो पंप, जेएसडब्ल्यू होल्डिंग या कंपन्यांना बसला. या कंपन्यांचे शेअर 12 ते 28 टक्क्यांनी कोसळले.
या आठवड्यात धातू आणि बँकिंग क्षेत्राचे निर्देशांक पाच टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाले. ग्राहक वस्तू, आरोग्य क्षेत्राचे निर्देशांक चार टक्क्यांनी कोसळले. वाहन व तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचे निर्देशांकही चार टक्क्यांनी कमी झाले. मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक एक टक्क्याने वाढला. या आठवड्यात एचडीएफसी बँक, स्टेट बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स या कंपन्यांचे नुकसान झाले तर इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टीसीएस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले.
डीआयआयकडून खरेदी –
या आठवड्यात देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 12,508 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री कमी झाली असली तरी या गुंतवणूकदारांनी या आठवड्यात 9,683 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. नोव्हेंबर महिन्यात देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 26,522 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. तर परदेशी गुंतवणूकदारांनी 29,533 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार खरेदी वाढवितात का याकडे इतर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.




