Stock Market: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (18 जुलै) शेअर बाजारात मोठी घसरण झाली. कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमजोर तिमाही निकाल, खाजगी बँका व वित्तीय समभागांतील घसरण, तसेच एफआयआय विक्री, अमेरिकेच्या फेडरल धोरणातील अनिश्चितता आणि तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे गुंतवणूकदारांच्या भावना नरमल्या. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आज 70 अंकांच्या घसरणीसह 82,193.62 वर उघडला. व्यवहारादरम्यान तो 81,608.13 अंकांपर्यंत खाली घसरला. दिवसाअखेर सेन्सेक्स 501.51 अंकांची (0.61%) घसरण नोंदवत 81,757.73 वर बंद झाला. एनएसई निफ्टी-50 (Nifty-50) ने देखील 25,108.55 वर व्यवहाराला सुरुवात केली. काही वेळातच हा निर्देशांक 25,000 च्या समर्थन पातळीखाली गेला आणि दिवसाअखेर 143.05 अंकांची (0.57%) घसरण नोंदवत 24,968.40 वर बंद झाला. टॉप गेनर्स आणि लूझर्स – आजच्या व्यवहारात एक्सिस बँक सर्वात मोठी तोट्याची कंपनी ठरली. तिचा समभाग तब्बल 5.25 टक्क्यांनी घसरला. याशिवाय कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टायटन, पावर ग्रिड आणि टेक महिंद्रा या कंपन्यांमध्येही घसरण दिसून आली. दुसरीकडे, बजाज फायनान्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि महिंद्रा अँड महिंद्रा या समभागांनी काही प्रमाणात तेजी दर्शवली. सेक्टरनिहाय कामगिरी – आज निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकात सर्वाधिक म्हणजेच 1.46% इतकी घसरण झाली. एक्सिस बँक, आरबीएल बँक, कोटक बँक आणि एचडीएफसी बँक यांसारख्या बँकांचे समभाग 5 टक्क्यांहून अधिक घसरले. निफ्टी बँक, फायनान्शियल सर्व्हिसेस, एफएमसीजी, ऊर्जा, ऑटो, रिअल्टी, तेल-गॅस आणि फार्मा निर्देशांकही लाल चिन्हात बंद झाले. मात्र निफ्टी मेटल, मीडिया आणि आयटी निर्देशांकांमध्ये किरकोळ तेजी दिसून आली. गेल्या सत्रात बाजाराची स्थिती (17 जुलै): गुरुवारी देखील बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. आयटी कंपन्यांचे कमकुवत निकाल आणि भारत-अमेरिका ट्रेड डीलवर ट्रम्प यांची टीका यामुळे गुंतवणूकदार सावध झाले. सेन्सेक्स 375.24 अंकांनी घसरून 82,259 वर बंद झाला, तर निफ्टी 100.60 अंकांची घसरण नोंदवत 25,111 वर बंद झाला होता. नजर पुढील आठवड्यावर: महत्त्वाच्या कंपन्यांचे तिमाही निकाल, जागतिक बाजाराचे संकेत आणि एफआयआय-डीआयआयचा व्यवहार यावर बाजाराची दिशा अवलंबून राहील. विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या दिग्गज कंपन्यांचे निकाल गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.