Stock Market: सलग तिसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकात घट

मुंबई – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश देत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 677 अंकांनी कमी होऊन 59,306 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.04 टक्क्यांनी म्हणजे 185 अंकांनी कमी होऊन 17,671 अंकांवर बंद झाला.
अमेरिकेतील विकास दर दोन टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिकन अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता काही गुंतवणूकदारांना वाटत आहे. तशीच परिस्थिती युरोपमध्ये आहे. त्यामुळे युरोप आणि अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले.
भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये आहे. त्यामुळे विक्रीचा सपाटा चालू असल्याचे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.
या आठवड्यात सेन्सेक्स तब्बल 1,514 अंकांनी तर निफ्टी 443 अंकांनी कोसळला आहे. गुंतवणूकदारांनी या महिन्यात आतापर्यंत 20 हजार कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग, वित्त या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले. आरोग्य, वाहन या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी त्यामुळे निर्देशांकांना पुरेसा आधार मिळाला नाही.





