Stock Market: युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे 27 फेब्रुवारीपासून जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे अतोनात नुकसान झाले आहे. या कालावधीत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 81,287 अंकावरून 9.4 टक्क्यांनी कमी होऊन 73,583 अंकावर आला आहे. या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 9.3 टक्क्यांनी कमी होऊन 25,168 अंकावरून 22,819 अंकावर आला आहे. या चार आठवड्यात शेअर बाजाराचे निर्देशांक 9 टक्क्यांनी कोसळल्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचे तब्बल 42 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही तूट भरून काढण्यासाठी बराच कालावधी लागेल. मात्र यामुळे किरकोळ गुंतवणूकदार हवालदील झाले आहेत. युद्धाआगोदर आखातातील खाडीतून रोज 20 दशलक्ष पिंप एवढे खनिज तेल जागतिक बाजारात येत होते. आता हे खनिज तेल जागतिक बाजारात येणे बंद झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम भारतासारख्या दक्षिण आशियातील देशावर व अप्रत्यक्ष परिणाम सर्वच देशावर झाला आहे. अनेक देशांमध्ये इंधनासाठी रेशनिंग सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार असल्यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेत आहेत. या कालावधीत भारतातील सर्व क्षेत्राच्या निर्देशांकावर परिणाम झाला आहे. त्यातल्या त्यात निफ्टी बँक आणि निफ्टी सरकारी बँका अनुक्रमे 13.6 टक्क्यांनी आणि 16 टक्क्यांनी कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भारतातील आगामी काळातील भांडवल पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे. अमेरिकेतही गुंतवणूकदारांचे नुकसान – अमेरिकेने इराणशी युद्ध सुरू केले असले तरी या घडामोडीचा अमेरिकन शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. या एक महिन्याच्या कालावधीत डाऊ जोन्स निर्देशांक 7.7 टक्क्यांनी, एस अॅण्ड पी 500 निर्देशांक 7.4 टक्क्यांनी तर तंत्रज्ञानावर आधारित नॅशडॅक 7.5 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्ध थांबविण्यासाठी दबाव येत असल्याचे वातावरण आहे. एफआयआयचा विक्रीचा जोर वाढला; 12 अब्ज डॉलरच्या शेअरची केली विक्री रुपया कोसळत असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना (एफआयआय) डॉलरमध्ये कमी नफा मिळतो. अशा परिस्थितीत युद्ध सुरू झाल्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात 12 अब्ज डॉलरची म्हणजे जवळजवळ 1.8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. आगामी काळात ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये या गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. मार्च महिन्यात यापेक्षा कितीतरी जास्त गुंतवणूक ह्या गुंतवणूकदारांनी काढून घेतली आहे. जर खनिज तेलाचे दर युद्ध संपल्यानंतर 85 ते 90 डॉलर प्रति पिंप या पातळीवर स्थिरावले तर भारताचा विकासदर अपेक्षित 7.2% वरून 6.5% इतका होण्याची शक्यता आता गृहीत धरली जात आहे. युद्ध जितका जास्त काळ लांबेल तेवढा भारताच्या विकासदरावर त्याचा जास्त नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे केवळ परदेशी गुंतवणूकदारच नाही तर देशातील किरकोळ गुंतवणूकदार ही शेअर बाजारात खरेदी टाळतील असे समजले जात आहे. भारतातील पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तो कमी झाला असण्याची शक्यता आहे. कंपन्यांना कच्चामाल महाग पडत आहे. त्याचबरोबर परदेशात कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या कामकाजाव याचा परिणाम झालेला आहे. जर खनिज तेलाचे दर 85 डॉलर या पातळीवर राहिले तर भारताला पन्नास अब्ज डॉलर अतिरिक्त मोजावे लागतील. हे रक्कम भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्के इतकी आहे. भारताला खनिज तेलाच्या आयातीसाठी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारणपणे साडेतीन टक्के रक्कम खर्च करावी लागते. भारताची अर्थव्यवस्था परकीय उर्जेवर अवलंबून असल्यामुळे त्याचा भारतावर जास्तच परिणाम होत आहे.