Stock Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार उसळी, सेंसेक्स १५७७ अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना १० लाख कोटींचा फायदा!

Share Market Today: भारतीय शेअर बाजाराने आज १५ एप्रिल रोजी सलग दुसऱ्या दिवशी जबरदस्त तेजी दाखवली. बीएसई सेंसेक्स १५७७ अंकांनी वधारून बंद झाला, तर निफ्टीने पुन्हा २३,३०० चा टप्पा ओलांडला. रियल्टी, बँकिंग आणि ऑटो क्षेत्रात सर्वाधिक खरेदी दिसून आली. यामुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य आज तब्बल १०.७ लाख कोटी रुपयांनी वाढले. बाजारात सर्वत्र खरेदीचा माहोल होता. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही ३ टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.
ही तेजी येण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला टॅरिफवरील सौम्य दृष्टिकोन आहे. ट्रम्प यांनी स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरवरील टॅरिफमध्ये सवलत जाहीर केली, तसेच ऑटो टॅरिफवर तूर्तास “स्थगिती” देण्याचे सांगितले. यामुळे जागतिक बाजारांना दिलासा मिळाला आणि भारतीय बाजारानेही या संधीचे स्वागत केले.
दिवसअखेरीस, बीएसई सेंसेक्स १५७७.६३ अंकांनी किंवा २.१० टक्क्यांनी वधारून ७६,७३४.८९ वर बंद झाला. दुसरीकडे, एनएसईचा ५० शेअर्सचा निफ्टी ५०० अंकांनी किंवा २.१९ टक्क्यांनी वाढून २३,३२८.५५ वर स्थिरावला.
गुंतवणूकदारांनी कमावले १०.७४ लाख कोटी रुपये –
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज १५ एप्रिल रोजी वाढून ४१२.२९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील व्यवहार दिनी, म्हणजेच शुक्रवारी ११ एप्रिल रोजी ४०१.५५ लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ, बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे १०.७४ लाख कोटी रुपयांनी वाढले. थोडक्यात, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १०.७४ लाख कोटींची भर पडली.
सेंसेक्समधील या ५ शेअर्सनी मारली बाजी –
बीएसई सेंसेक्समधील ३० पैकी २८ शेअर्स आज तेजीसह बंद झाले. यामध्ये इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये ६.८४ टक्क्यांची सर्वाधिक वाढ दिसली. त्यानंतर टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, ॲक्सिस बँक आणि अदानी पोर्ट्स यांचे शेअर्स ४.१३ ते ४.५० टक्क्यांनी वधारले.
फक्त २ शेअर्स घसरणीसह बंद –
सेंसेक्समधील फक्त दोन शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. आयटीसीचा शेअर ०.३६ टक्क्यांनी आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर ०.२८ टक्क्यांनी खाली आला.
३,३०५ शेअर्सनी घेतली उसळी –
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वर आज तेजीत बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. एकूण ४,२५६ शेअर्समध्ये व्यवहार झाले, यापैकी ३,३०५ शेअर्स तेजीसह बंद झाले. ७८२ शेअर्समध्ये घसरण दिसली, तर १६९ शेअर्स सपाट बंद झाले. याशिवाय, ९१ शेअर्सनी व्यवहारादरम्यान त्यांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ४९ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.





