Stock market rises: गुंतवणूकदारांची निवडक खरेदी; सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी!
Stock market rises:

Stock market rises – गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच कमी झाले होते. त्यामुळे कंपन्यांचे शेअर तुलनेने कमी दरावर उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार धातू, माहिती तंत्रज्ञान आणि बँकांच्या शेअरची निवडक खरेदी करीत आहेत. परिणामी सलग दुसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशाकात वाढ होण्यास मदत झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारी 173 अंकांनी म्हणजे 0.21 टक्क्यांनी वाढून 83, 450 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 42 अंकांनी म्हणजे 0.17 टक्क्यांनी वाढून 25, 725 अंकावर बंद झाला.
आयटीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन अँड ट्यूब्रो, इन्फोसिस, टायटन, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, सन फार्मा, मारुती सुझुकी, इंडिगो, स्टेट बँक, टेक महिंद्रा या बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. मात्र टाटा स्टील, ईटर्नल, ट्रेन्ट, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा, बजाज फिन्सर्व, अॅक्सिस बँक, एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये माफक प्रमाणात वाढ झाली. जागतिक शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. जपान येथील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. दक्षिण कोरिया, चीन, हाँगकाँग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक स्थानिक नववर्षामुळे बंद होते. युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. तर अमेरिकेतील शेअर बाजाराचे कामकाज बंद होते.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 972 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,680 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. माहिती भूराजकीय तणाव अजून संपुष्टात आलेले नाहीत. त्याचबरोबर एआय तंत्रज्ञानाचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळ निर्देशांकात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




