मुंबई – भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असताना जीएसटी दर कपात झाल्यानंतर विकासदराची विक्रमी आकडेवारी जाहीर झाली. त्यातच रिझर्व बँकेने गेल्या आठवड्यात पाव टक्के व्याजदर कपात करून दीड लाख कोटी रुपयांची भांडवल सुलभता उपलब्ध केली. असे असले तरी पुढील आठवड्यातील रिझर्वच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी गुंतवणूकदारांनी तुफान नफेखोरी केली. अशा अवस्थेत किरकोळ गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 609 अंकांनी कोसळून 85,102 अंकावर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 836 अंकापर्यंत कोसळला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दोन दिवसाच्या तेजीनंतर सोमवारी 225 अंकांनी म्हणजे जवळजवळ एक टक्क्यांनी कोसळून 25,960 अंकावर बंद झाला. भारत इलेक्ट्रॉनिक्स, इटर्नल, ट्रेन्ट, टाटा स्टील, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, बजाज फिन्सर्व, स्टेट बँक, पॉवर ग्रीड, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, टायटन, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, एअरटेल या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. बजाज ब्रोकिंग या संस्थेने बाजारातील घडामोडीबाबत सांगितले की, भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असूनही फेडरल रिझर्वच्या पत धोरणामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. त्यातच जपानमधील कर्जरोख्यावरील परतावा अनेक वर्षांच्या उचांकावर गेल्यामुळे जागतिक बाजारात संमिश्र वातावरण होते. अशा परिस्थितीत सावध गुंतवणूकदारांनी नफेखोरी करणे पसंद केले. सध्याच्या परिस्थितीत निफ्टीला 25,9 00 व 25,700 अंकावर चांगला आधार असल्याचे तांत्रिकदृष्ट्या दिसते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालूच असून शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 4,38 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 41,89 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून शुक्रवारी निर्देशांकांना आधार दिला होता. खनिज तेलाच्या किमती सध्या 63 डॉलर या पातळीवर आहेत. त्यामुळे या आडीवर फारशी नकारात्मक परिस्थिती नाही. फक्त रुपया घसरत आहे आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत आहेत, या दोनच बाबी नकारात्मक आहेत.