मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढली आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 7,470 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. असे असतानाच देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार म्हणजे एफआयआय नफा काढून घेत आहेत. मात्र तरीही सोमवारी शेअर बाजाराचे निर्देशांक दीड टक्क्याने वाढून सहा आठवड्याच्या उच्चांकावर गेले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,078 अंकांनी म्हणजे 1.40 टक्क्यांनी वाढून 77,984 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 307 अंकांनी म्हणजे 1.32 टक्क्यांनी वाढून 23,658 अंकावर बंद झाला. 6 फेब्रुवारीनंतर निर्देशांक प्रथमच इतक्या उच्च पातळीवर गेले आहेत. आज झालेल्या खरेदीचा फायदा बँकिंग आणि तेल व नैसर्गिक वायू क्षेत्राला जास्त प्रमाणात झाला. अमेरिका आणि युरोपातील निर्देशांक वाढले होते तर आशिया खंडातील निर्देशांक कमी झाले होते. परकीय गंगाजळी वाढत असल्यामुळे रुपयाला आधार मिळत असून रुपयाची 2025 मध्ये झालेली हानी भरून निघाली आहे. त्याचा निर्देशांकांना आधार मिळत आहे. एनटीपीसी आघाडीवर एनटीपीसी कंपनीच्या शेअरचा भाव 4.61 टक्क्यांनी वाढला. त्याबरोबरच स्टेट बँक, टेक महिंद्रा, पावर ग्रीड, बजाज फिन्सर्व, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर इंडसइंड बँक, महिंद्रा, एअरटेल, नेस्ले, इन्फोसिस या कंपन्या पिछाडीवर राहिल्या. व्याजदर कपातीची अपेक्षा भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम असल्याची आकडेवारी जाहीर होत आहे. त्यातच महागाई कमी असल्यामुळे एप्रिलच्या दुसर्या आठवड्यामध्ये व्याजदर कपात होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. अमेरिका आणि भारत आयात शुल्काच्या मुद्यावर परस्परांना पूरक तोडगा काढण्याची शक्यता बर्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. अशा परिस्थितीत शेअर निर्देशांक वाढत असल्याचे सांगण्यात आले. सर्व क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ खरेदी विस्तारित होती. त्यामुळे मिडकॅप आणि स्मॉल कॅप सह सर्वच क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये वाढ झाली. शेअर बाजारावर नांदलेल्या एकूण कंपन्यापैकी 2,496 कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर 1,640 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. 162 कंपन्यांच्या शेअरचे भाव स्थिर राहिले. सहा दिवसात पाच टक्के वाढ गेल्या सहा कामकाजाच्या दिवसांमध्ये मुख्य निर्देशांकामध्ये तब्बल 5 टक्क्याची वाढ झाली आहे. ऑक्टोबर पासून शेअर बाजार निर्देशांकाचा झालेला घसारा बर्याच प्रमाणात कमी झाला आहे. या सहा दिवसात सेन्सेक्स4,100 अंकांनी म्हणजे पाच टक्क्याने तर निफ्टी 1,260 अंकांनी म्हणजे 5.5 टक्क्यांनी वाढला आहे. ऑक्टोबरच्या अगोदर सेन्सेक्स 86,000 अंकावर होता तो आता 78 हजार अंकाच्या जवळपास आला आहे. त्यामुळे पूर्ण तूट भरून काढण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.