Stock Market : सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसभरातील अस्थिरतेनंतर अखेरच्या टप्प्यात जोरदार नफावसुलीमुळे प्रमुख निर्देशांक खाली आले. सेन्सेक्स 331 अंकांची घसरण नोंदवून बंद झाला, तर निफ्टीने 25960 चा महत्त्वाचा आधार गमावला. सेन्सेक्स ३३१.२१ अंकांनी (०.३९%) घसरून ८४,९००.७१ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी ५० १०८ अंकांनी (०.४२%) घसरून २५,९५९.१५ च्या पातळीवर बंद झाला. बँक निफ्टी ३२ अंकांनी घसरून ५८,८३५ वर बंद झाला. मिडकॅप इंडेक्स १९५ अंकांनी घसरून ६०,०८२ वर बंद झाला. कामकाजची सुरुवात हिरव्या निशाणीवर झाली असली तरी, दुपारनंतर गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. निफ्टी २६,००० च्या वर टिकू शकला नाही, ज्यामुळे बाजार लाल निशाणीत बंद झाला. जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे रिसर्च हेड विनोद नायर यांनी सांगितले की, दिवसभर बाजारात किरकोळ वाढ दिसून येत होती, पण शेवटच्या अर्ध्या तासात सोमवारची एक्सपायरी आणि नफावसुलीमुळे विक्री वाढली. अमेरिका-भारत व्यापार करार अंतिम होण्यास विलंब झाल्याच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण होते. मात्र, आयटी (IT) सेक्टरमधील निवडक खरेदीमुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला. नायर यांच्या मते, जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण आहे. अमेरिकेतील चांगल्या नोकरीच्या आकडेवारीमुळे डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची शक्यता पुन्हा बळावली आहे. देशांतर्गत स्तरावरही जीडीपी वाढ, नियंत्रणात असलेली महागाई, स्थिर कच्चा तेल आणि मजबूत कॉर्पोरेट निकाल यामुळे बाजारात स्थिरता टिकून आहे. आजचे टॉप गेनर्स (वाढलेले शेअर्स) – सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ५ शेअर्स तेजीसह बंद झाले. सर्वाधिक वाढ टेक महिंद्रा (+२.४३%) च्या शेअर्समध्ये झाली. त्यानंतर एशियन पेंट्स (+०.४६%), इन्फोसिस (+०.२५%), अडानी पोर्ट (+०.१८%) आणि सन फार्मा (+०.१४%) च्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आजचे टॉप लूजर्स (घटलेले शेअर्स) आजच्या कामकाजात सर्वाधिक घसरण बीईएल (BEL) मध्ये झाली, जो ३.०९% नी घसरून बंद झाला. याशिवाय, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) मध्ये १.८९% ची, टाटा स्टील मध्ये १.६१% ची, अल्ट्राटेक सिमेंट मध्ये १.२२% ची आणि बजाज फिनसर्व्ह मध्ये १.१३% ची घसरण नोंदवली गेली. क्षेत्रांवर परिणाम बाजारपेठेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी बिकवाली दिसून आली. निफ्टी IT इंडेक्स उच्च स्तरावरून १% घसरला. संरक्षण (डिफेन्स), रिअल्टी, मेटल, एनर्जी आणि तेल-गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव राहिला.