मुंबई – अमेरिकेत महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा व्याजदर कपात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अमेरिकासह जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. अशा परिस्थितीत भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात सोमवारी पाऊण टक्क्याची वाढ झाली. माहिती तंत्रज्ञान, वाहन आणि धातू क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचा कल होता. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 638 अंकांनी वाढून 85,567 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 206 अंकांनी म्हणजे 0.19 टक्क्यांनी वाढून 26,172 अंकावर बंद झाला. अमेरिकेत व्याजदर कपात होणार असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा काही निधी भारतीय शेअर बाजाराकडे पुन्हा वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या गुंतवणूकदारांनी खरेदी चालू ठेवली आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 1,830 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 5,722 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. यामुळे निर्देशांकांना खर्या अर्थाने आधार मिळत आहे. खनिज तेलाचे दर सध्या 60 डॉलर या पातळीवर आहेत आणि रुपयाचे मूल्य स्थिर होऊ लागले आहे. त्यामुळेही देशातील किरकोळ गुंतवणूकदार खरेदीसाठी पुढाकार घेत असल्याचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत इन्फोसिस कंपनीच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांनी वाढला. टेक महिंद्रा, टसीएस या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. एअरटेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा मोटर्स, रिलायन्स आणि मारुती कंपन्यांनीही तेजीचे नेतृत्व केले. मात्र स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड ट्यूब्रो यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. शेअर बाजारात खरेदीचा इतका जोर होता की, सर्वच क्षेत्राचे निर्देशांक वाढले. शेअर बाजारावर नोंदलेल्या 2,796 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर 1,514 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. रिझर्व बँकेने रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचा अर्थ सध्याच्या पातळीवर रुपया स्थिर होईल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. क्षेत्र वाढ स्मॉल कॅप 1.12% मिडकॅप 0.80% आयटी 1.99% भांडवली वस्तू 1.65% इंडस्ट्रियल्स 1.33% धातू 1.32%