Stock Market: भारत–युरोप मुक्त व्यापार कराराचा सकारात्मक परिणाम; या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये जोरदार तेजी
Stock Market: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 487 अंकांनी वाढून 82,344 अंकावर बंद झाला.

Stock Market: भारत आणि युरोपियन समुदायादरम्यान मुक्त व्यापार करार झाल्यामुळे कालपासून शेअर बाजारात खरेदीचे वातावरण कायम आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करत असले तरी देशातील संस्थागत गुंतवणूकदार जोरदार खरेदी करीत आहेत. अशा परिस्थितीत बुधवारी शेअर निर्देशांकात बरीच वाढ झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 487 अंकांनी वाढून 82,344 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 167 अंकांनी म्हणजे 0.66 टक्क्यांनी वाढून 25,342 अंकावर बंद झाला.
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरचा भाव आज नऊ टक्क्यांनी वाढला. या कंपनीबरोबरच ईटरर्नल, बजाज फायनान्स, पॉवर ग्रीड, ट्रेन्ट, महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. एशियन पेंट्स, मारुती, सन फार्मा, इन्फोसिस, भारती एअरटेल या कंपन्या शेअरच्या भावात घट झाली. यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव चार टक्क्यांनी कमी झाला.
भारत – युरोपियन समुदायदरम्यान केवळ व्यापार करार झालेला नाही तर या दोन्ही क्षेत्राच्या नेत्यांनी पुढील पाच वर्षात व्यापाराशिवाय संरक्षण, गुंतवणूक इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचा संकल्प केला आहे. अशा परिस्थितीत युरोपातील आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक भारतात येण्यास मदत मिळणार आहे.
त्याचबरोबर भारतातील अनेक क्षेत्रातील वस्तूची युरोपियन समुदायाला निर्यात होणार आहे. भारतातील 99% वस्तूवर युरोपात कर लागणार नाही. तर युरोपातील 97% वस्तूंवर भारतात कर लागणार नाही. विशेषत: कापड, समुद्री खाद्य, कृषी उत्पादने इत्यादी क्षेत्राची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान जागतिक व्यापार युद्ध आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ठ ट्रम्प विविध देशाविरोधात करत असलेल्या बेफाम वक्तव्यामुळे चलन बाजारातील अस्थिरता अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत रुपया कमकुवत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार शेअरची विक्री करीत आहेत. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी निर्देशांक वाढूनही 3,066 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 8,999 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना मजबूत आधार दिला.
अमेरिकेने भारताला आयात शुल्क वाढवून एकाकी पाडल्यानंतर भारताला आता युरोपियन समुदायाचा मोठा आधार मिळाला आहे. त्याचबरोबर इतर अनेक देशाबरोबर व्यापार करार करण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुखावले आहेत. जागतिक बाजारात आज संमिश्र वातावरण होत.े दरम्यान खनिज तेलाच्या किमती 67 डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. जर या किमती आणखी वाढल्या तर याचा निर्देशांकावर दबाव येऊ शकतो.




