मुंबई – रशियाबरोबर युक्रेनेही नरमाईची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशासह चार राज्यांत भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळाल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकांत कालच्या प्रमाणे आजही भरघोस वाढ नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 817 अंकानी वाढून 55,464 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 249 अंकांनी म्हणजे 1.50 टक्क्यांनी वाढून 16,594 अंकांवर बंद झाला.
हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती सुझुकी, स्टेट बॅंक, ऍक्सिस बॅंक, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली. टेक महिंद्रा, डॉक्टर रेड्डीज, टाटा कन्सल्टन्सी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
स्वास्तिका इन्व्हेस्टमार्ट त्या कंपनीचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले की, गेल्या 15 दिवसात निर्देशांकाची रशिया- युक्रेन युद्धामुळे हानी झाली हाती. मात्र आता हे दोन्ही पक्ष चर्चा करणार आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. त्याचबरोबर पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे राजकारण स्थिर राहील असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
लवकरच अमेरिकेच्या महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या आधारावर फेडरल रिझर्व लवकरच आवश्यक तो निर्णय घेणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. जपान, हॉंगकॉंग, चीनमधील शेअर बाजार निर्देशांक वाढले. अमेरिकेचे शेअर बाजार निर्देशांकही वाढले होते. देशांतर्गत गुंतवणुकदार खरेदी करीत असले तरी परदेशी गुंतवणूकदार मात्र अजूनही विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. काल परदेशी गुंतवणूकदारांनी 4,818 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्माल कॅप 1.16 टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर मिड कॅप निर्देशांकातही भरीव वाढ झाली. ग्राहक वस्तू, रिऍल्टी,धातू, बॅंकासह सर्वच क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये वाढ झाली. मुंबई शेअर बाजारातील 2,433 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर 929 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.