Stock Market: आखाती युद्ध निवळण्याची चिन्हे वाढत आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी काही गुंतवणूकदारांनी नफेखोरी कल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात काही प्रमाणात घट नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 122 अंकांनी म्हणजे 0.16 टक्क्यांनी कमी होऊन 77,988 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 34 अंकांनी कमी होऊन 24,196 अंकावर बंद झाला. बँका आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. हेही वाचा – पुणे पीपल्स बँकेच्या व्यवसायात वाढ; बँकेला रिझर्व्ह बँकेकडून डायरेक्ट मेंबरशिप प्राप्त बुधवारी शेअर बाजार निर्देशांकात एक टक्का वाढ झाली होती. एचडीएफसी बँकेचा शेअर 1.75 टक्क्यांनी घसरला. टायटन, महिंद्रा, एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर ईटर्नल, अदानी पोर्ट्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. आता शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. आखातातील युद्धासंदर्भातील चर्चेकडे गुंतवणूकदारांचे सध्या जास्त लक्ष असल्याचे सांगितले जाते. हेही वाचा – श्री तिरूपती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद मुंदडा यांची निवड अग्रवाल यांचा डोळसपणे शेअर खरेदी करण्याचा सल्ला सध्याच्या अनिश्चित परिस्थितीत भांबावून न जाता डोळसपणे जे शेअर दीर्घ पल्ल्यात वाढू शकतात ते ओळखून खरेदी करण्याचा सल्ला मोतीलाल ओसवाल कंपनीचे अध्यक्ष रामदेव अग्रवाल यांनी दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत बँका आकर्षक आहेत. मात्र माहिती तंत्रज्ञान कंपन्याबाबत सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जमाव जे करत आहेत ते करणे टाळून ज्या कंपन्यांच्या मूलभूत बाबी बळकट आहेत मात्र ज्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे असे शेअर सध्याच्या परिस्थितीत खरेदी केल्यास दीर्घ पल्ल्यात यातून नफा मिळू शकतो. भांडवलाशी संबंध असलेल्या बँका आणि वित्तीय सेवा कंपन्या सध्याच्या परिस्थितीत दीर्घ पल्ल्यास जास्त परतावात देऊ शकतात असे त्यांना वाटते. मात्र माहिती तंत्रज्ञान कंपन्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. कारण जागतिक पातळीवर विविध देशा अडचणीत आल्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा नेमका किती परिणाम झालेला आहे याचे खात्रीशीर मूल्यांकन अजून उपलब्ध नाही. जोपर्यंत या बाबी स्पष्ट होत नाही तोपर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र टाळण्याची गरज त्यांनी सूचित केली. भारतीय बँकांची परिस्थिती कमालीची बळकट आहे. आगामी काळात उद्योगांना भांडवल लागणार आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन ते तीन वर्ष भारतीय बँकांच्या शेअरमधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांना वाटते. अर्थ मंत्रालयाने आणि रिझर्व बँकेने केलेल्या उपाययोजनामुळे भारतातील बँकांची अनुत्पादक मालमत्ता निचांंकी पातळीवर आहे. खासगी बँकांचे परदेशी गुंतवणूकदारांनी बरेच भांडवल खरेदी केले आहे. ज्या क्षेत्राचे कामकाज आपल्याला समजते अशाच क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचा पुन्हा सल्ला अग्रवाल यांनी दिला. इतर गुंतवणूक करतात म्हणून आपण गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते असे त्यांनी स्पष्ट केले.