Stock Market: आखातातील संघर्ष निवळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे खनिज तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत शेअर बाजाराचे निर्देशांक बुधवारी 1.64 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य बुधवारी 9.41 लाख कोटी रुपयांनी वाढून 458 लाख कोटी रुपये म्हणजे 4.91 लाख कोटी डॉलरवर गेले आहे. 28 फेब्रुवारीपासून शेअर बाजार निर्देशांकात होत असलेली घट गेल्या आठवड्यापासून मंदावली आहे आणि शेअर बाजाराचे निर्देशांक वेगाने पूर्वपदावर येऊ लागले आहेत. जर निर्देशांक असेच वाढले तर लवकरच कंपन्यांचे बाजार मूल्य 500 लाख कोटी रुपये या पूर्वीच्या पातळीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे विश्लेषकाने नमूद केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की आता इराणचे इतके नुकसान झाले आहे की इराण पुढील वीस वर्ष कोणालाही त्रास देऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत इराणबरोबर पुन्हा चर्चा होणार आहे. अशा अवस्थेत इराणशी पुन्हा संघर्ष वाढविण्याची शक्यता कमी आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अमेरिका आणि युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. इराणचे बरेच नुकसान झाले असल्यामुळे इराणबरोबर दीर्घ पलल्यात युद्ध होण्याची शक्यता कमी आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. इराणनेही आक्रमक भाषा केलेली नाही. अशा परिस्थितीत युद्ध लवकर संपू शकते असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराबरोबरच जागतिक शेअर बाजारातही खरेदीचे वातावरण आहे. सेन्सेक्स 1,263 अंकांनी वाढून 78,111अंकावर – मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स बुधवारी 1,263 अंकांनी म्हणजे 1.64 टक्क्यांनी वाढून 78,111अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 388 अंकांनी वाढून 24,231 अंकावर बंद झाला. खनिज तेलाचे दर कालपासून 100 डॉलरपेक्षा कमी पातळीवर आहेत. याचा एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेला लाभ होऊ शकतो. तसेच शेअर बाजाराचे निर्देशांकही आता घसरणार नाहीत असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली खरेदी चालूच राहिली. खरेदीचा जोर इतका जास्त होता की, बहुतांश क्षेत्राचे निर्देशांक बुधवारी वाढले. 3,585 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर 802 कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार घट झाली. दक्षिण कोरिया, जपान, शान्घाय, हाँगकाँग, युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. दरम्यान रुपयाचे मूल्य अजूनही कमी पातळीवर आहे. अशा परिस्थितीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 1,983 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 2,432 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना आधार दिला. इराण आणि अमेरिकेदरम्यानची चर्चा शनिवारी फिस्कटल्यामुळे सोमवारी शेअर बाजार निर्देशांकात घट झाली होती. मात्र ही झीज बुधवारी भरून निघाली आहे. रिझर्व्ह बँकेने 15 दिवसांपूर्वी रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा काही प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे रुपयाचे मूल्य स्थिर पातळीवर आहे. त्याचबरोबर युद्ध समाप्त होणार असल्यामुळे एकूणच शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. अशा परिस्थितीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निफ्टी आयटी निर्देशांक बुधवारी 2.84 टक्क्यांनी म्हणजे 869 अंकांनी वाढून 31,539 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची खरेदी वाढली – बाजार उघडल्यापासूनच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची खरेदी वाढली होती. त्यामुळे निर्देशांक दिवसभर वाढत गेला. दुपारच्या सुमारास हा निर्देशांक कालच्या तुलनेत दोन टक्क्यापर्यंत वाढला होता. मात्र नंतर पुन्हा खरेदी वाढली. विश्लेषकांनी सगितले की, गेल्या सहा महिन्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर बराच नकारात्मक परिणाम झाला आहे. व्यापार युद्ध भूराजकीय तणाव आणि कृत्रीम बुद्धिमत्ता या कारणामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची बरीच पिछेहाट झाली होती. युद्ध संपल्यानंतर देशातील आणि परदेशातील कंपन्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवतील, त्याचबरोबर रुपया कमी पातळीवर असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा महसूल रुपयात वाढेल. या कारणामुळे सध्या गुंतवणूकदार माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची जास्त प्रमाणात खरेदी करीत आहेत असे सांगितले जाते. मात्र अजूनही आठवड्याच्या पातळीवर निफ्टी आयटी निर्देशांक 0.08 टक्क्यांनी कमी झाला आहे. तर महिन्याच्या पातळीवर या निर्देशांकात 8.49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वार्षिक पातळीवर निफ्टी आयटी निर्देशांक 5.22 टक्क्यांनी कमी आहे. मात्र परिस्थिती वेगाने सुधारण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आज झालेल्या खरेदीचा फायदा एम्फायसीस, विप्रो, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसीस या कंपन्यांना झाला. मात्र युद्ध अजूनही समाप्त झालेले नाही.अशा परिस्थितीत गुंतवणूकदार कमालीचे सावध असल्याचे दिसून येते.