Stock Market: अदानी समूहाचे संकट आणि जागतिक घडामोडींचा बाजाराला फटका; 16 लाख कोटींचे नुकसान
Stock Market: सरलेल्या आठवड्यात शेअर निर्देशांकात अडीच टक्क्यांची घट

Stock Market: भारतीय कंपन्यांनी सादर केलेले तिसर्या तिमाहीचे सुमार ताळेबंद, खनिज तेलाच्या वाढत असलेल्या किमती, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जागतिक व्यापार आणि राजकीय क्षेत्रातील हाराकिरी या कारणामुळे सरलेल्या आठवड्यात जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारातही कमालीचे अस्थिर वातावरण होते.
अशा परिस्थितीत शेअर बाजाराचे निर्देशांक अडीच टक्क्यांनी कमी झाले. परिणामी शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य या आठवड्यात 16 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
आठवड्याच्या पातळीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2,032 अंकांनी म्हणजे 2.43 टक्क्यांनी कमी 81,537 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 645 अंकांनी म्हणजे 2.51 टक्क्यांनी कोसळून 2,5048 अंकावर बंद झाला.
शुक्रवारी बाजार बंद होताना आठवड्याच्या पातळीवर शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 16 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 451 लाख कोटी रुपये म्हणजे 4.93 लाख कोटी डॉलर या पातळीवर गेले होते.
या आठवड्यात रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत प्रथमच 92 रुपये खाली गेले. शुक्रवारअखेर रुपयाचा भाव 91.90 रुपये प्रति डॉलर या या पातळीवर होता. या आठवड्याच्या शेवटी अदानी समूहाच्या कंपन्याचे प्रचंड नुकसान झाले. या समूहाच्या प्रवर्तकाविरोधात अमेरिकेतील शेअर बाजार नियंत्रक चौकशी करीत आहेत.
आतापर्यंत नियंत्रकांनी या प्रवर्तकांना समन्स पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पोचू शकले नाहीत. त्यामुळे नियंत्रकानी अमेरिकेतील न्यायालयात ई-मेल द्वारे समन्स पाठविण्याची परवानगी मागितल्यानतर या समूहातील कंपन्यांचे शेअर कोसळले.
परिणामी अदानी एंटरप्राईजेस कंपनीच्या शेअरचा भाव 10.55 टक्क्यांनी कमी होऊन 1,864 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. या समूहातील बहुतांश कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे या समूहाचे बाजार मूल्य शुक्रवारी 12.5 अब्ज डॉलरने कमी झाले.
दरम्यान अदानी समूहाने त्यांच्यावरील अमेरिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचा वेळोवेळी इन्कार केला आहे. पुन्हा या समूहाने या आरोपाचा इन्कार केला आणि आपण अमेरिकन न्यायालयामध्ये हे आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करू असे म्हटले आहे.





