Stock Market: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे कल आणि कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा सरस आलेले तिमाही निकाल यामुळे आज भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स ३५६ अंकांनी वधारून बंद झाला, तर निफ्टीने २४,१०० चा टप्पा ओलांडला. मात्र, दिवसभराच्या उच्चांकी स्तराचा विचार करता, सेन्सेक्समध्ये सुमारे ६०० अंकांची घसरण झाली, जी बाजारातील तीव्र नफेखोरीचे (Profit Booking) संकेत देत आहे. बाजाराची आजची कामगिरी – आजच्या व्यवहारात आयटी आणि बँकिंग समभागांमध्ये काहीशी कमकुवतता दिसून आली. निवडणुकीच्या निकालांशी संबंधित अस्थिरतेमुळे बाजाराने वरच्या स्तरावरून माघार घेतली. BSE सेन्सेक्स ७७,२५७.२७ वर उघडल्यानंतर इंडेक्सने ७७,९१०.७५ चा उच्चांक गाठला होता. मात्र, अखेर तो ०.४६% च्या वाढीसह ७७,२६९.४० वर स्थिरावला. निफ्टी ५०ने २४,०६३.५५ वर सुरुवात झाल्यानंतर इंडेक्सने २४,२९०.२० पर्यंत मजल मारली होती. दिवसाअखेर १२२ अंकांच्या (०.५१%) वाढीसह निफ्टी २४,११९.३० वर बंद झाला. हेही वाचा – प. बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? ‘या’ 5 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत क्षेत्रीय कामगिरी – आज निफ्टी रियल्टी आणि निफ्टी मेटल निर्देशांकांनी बाजाराला बळ दिले. दुसरीकडे, निफ्टी आयटी आणि पीएसयू बँकांच्या कामगिरीत सुस्ती पाहायला मिळाली. मिडकॅप आणि स्मॉलकैप इंडेक्स अनुक्रमे ०.६३% आणि ०.७०% वाढीसह बंद झाले. निवडणूक निकालांचा प्रभाव आणि जागतिक संकेत – जिओजित इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, “पश्चिम बंगालमधील भाजपच्या अनुकूल कामगिरीने आणि भक्कम Q4 निकालांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. मध्य-पूर्वेतील तणावाकडे सध्या बाजाराने दुर्लक्ष केले असले, तरी अमेरिकेच्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ अंतर्गत स्ट्रॅट ऑफ होर्मुझ उघडण्याबाबतच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी नफेखोरीला प्राधान्य दिले.” हेही वाचा – मोठा राजकीय भूकंप! स्वतःच्या बालेकिल्ल्यात थेट मुख्यमंत्र्यांचाच झाला पराभव कच्च्या तेलात घसरण: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन फ्रीडम’ची घोषणा केल्यानंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे २.४५% घसरण झाली. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $११० च्या खाली राहणे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (महागाई आणि रुपयाच्या दृष्टीने) दिलासादायक मानले जात आहे. राजकीय घडामोडींवर लक्ष – मतमोजणीच्या कलानुसार, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. केरळमध्ये यूडीएफ (UDF) आघाडीवर असून, तामिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने प्रस्थापित पक्षांना धक्का देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.