Stock Market : अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ धक्क्याने भारतीय शेअर बाजार कोसळला! ‘आयटी’ स्टॉक्स घसरले, ‘फार्मा’ शेअर्सनी सावरलं

Stock Market Closing 3 April: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतासह इतर देशांतून होणाऱ्या आयातीवर 27 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी (3 एप्रिल) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ट्रंप यांच्या या निर्णयामुळे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सवर प्रचंड दबाव आला आणि बाजार खाली घसरला.
बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आज 700 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 75,811 वर उघडला. दिवसभरातील व्यवहारात तो 75,807.55 अंकांपर्यंत खाली आला. मात्र, फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे बाजाराला काहीसा आधार मिळाला. अखेरीस सेन्सेक्स 322.08 अंकांनी म्हणजेच 0.42 टक्क्यांनी घसरून 76,295.36 वर बंद झाला.
त्याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी-50 (Nifty-50) हा निर्देशांकही सुमारे 200 अंकांच्या घसरणीसह 23,150.30 वर उघडला. व्यवहारादरम्यान तो 23,145.80 या नीचांकी पातळीवर पोहोचला. शेवटी निफ्टी 82.25 अंकांनी म्हणजेच 0.35 टक्क्यांनी खाली येऊन 23,250 वर स्थिरावला.
आयटी शेअर्समध्ये घसरण –
ट्रंप यांनी भारतासह 180 देशांवर नवे टॅरिफ लादण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला. याचा परिणाम अमेरिकन बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. टीसीएसचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले, तर एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्सही 4 टक्क्यांनी कोसळले.
फार्मा क्षेत्रात जोरदार उसळी –
ट्रंप यांनी भारतीय वस्तूंवर 26 टक्के टॅरिफ लादले असले तरी फार्मास्युटिकल उत्पादनांना यातून वगळण्यात आलं आहे. यामुळे फार्मा शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. निफ्टी फार्मा निर्देशांक 4.9 टक्क्यांनी वधारला आणि व्यवहारादरम्यान 21,996.6 या उच्चांकावर पोहोचला.
ट्रंप यांचा 27% टॅरिफचा निर्णय –
ट्रंप यांनी भारतासह इतर देशांतून होणाऱ्या आयातीवर “रेसिप्रोकल टॅरिफ” लादण्याची घोषणा केली आणि याला “काइंड रेसिप्रोकल” असं संबोधलं. त्यांच्या मते, भारताच्या टॅरिफ धोरणं “खूप कठोर” आहेत. त्यामुळे अमेरिका भारतातून येणाऱ्या सर्व आयातीवर 26 टक्के शुल्क लावणार आहे, जो भारताने अमेरिकन उत्पादनांवर लावलेल्या शुल्काच्या निम्मा आहे. व्हाइट हाउसच्या रोज गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ट्रंप यांनी चीनवर 34 टक्के (यापूर्वीचे 20 टक्के धरून), युरोपीय संघावर 20 टक्के, जपानवर 24 टक्के आणि दक्षिण कोरियावर 25 टक्के टॅरिफ जाहीर केले.




