Stock Market: पश्चिम आशियातील (मिडल ईस्ट) युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक बाजारातील अनिश्चिततेचा मोठा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. शुक्रवारी व्यवहाराच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ सुमारे १,६९० अंकांनी (२.२%) कोसळून ७३,५८१ वर बंद झाला. तर ‘निफ्टी-५०’ ने २३ हजारांची महत्त्वाची पातळी तोडत २२,८२८ पर्यंत खाली झेप घेतली. या प्रचंड पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात तब्बल ८.५ लाख कोटी रुपये मातीत मिळाले आहेत. गुरुवारी राम नवमीनिमित्त भारतीय बाजार बंद होते, मात्र त्या काळात जागतिक बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडल्या. शुक्रवारी बाजार उघडताच भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक नकारात्मक संकेतांशी जुळवून घ्यावे लागले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले ६ एप्रिलपर्यंत थांबवल्याचे जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. कच्च्या तेलाचा भडका आणि रुपयाची घसरण – Stock Market भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा १०८ ते ११० डॉलर प्रति बॅरलच्या घरात पोहोचल्या आहेत. भारत हा खनिज तेलाचा मोठा आयातदार असल्याने वाढत्या किमतींचा थेट परिणाम महागाई आणि रुपयाच्या मूल्यावर होत आहे. शुक्रवारी रुपयाने ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली, ज्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली. सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी जागतिक स्तरावरील वाढत्या किमतींचे संकट कायम आहे. हेही वाचा – हॉटेल आणि औद्योगिक क्षेत्रातील गॅस टंचाई दूर होणार; सरकारने कमर्शियल एलपीजीचा पुरवठा वाढवला दिग्गज शेअर्सना मोठी गळती – Stock Market बाजारातील ही घसरण सर्वव्यापी होती. निर्देशांकात लार्जकॅप कंपन्यांना विक्रीचा सर्वाधिक फटका बसला. रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. एचडीएफसी बँक ३ टक्क्यांहून अधिक घसरला तसेच एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एसबीआय यांसारखे बँकिंग शेअर्सही लाल निशाणीत बंद झाले. ऑटो आणि कन्झम्प्शन क्षेत्रातील मारुती आणि टायटन यांसारख्या शेअर्समध्येही मोठी पडझड झाली. तज्ज्ञांचा इशारा: आगामी काळ आव्हानात्मक – Stock Market जिओजित इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, “बँकिंग, केमिकल्स, रिअल्टी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सनी या घसरणीचे नेतृत्व केले. जोपर्यंत भू-राजकीय तणाव निवळत नाही आणि कच्च्या तेलाचे दर स्थिर होत नाहीत, तोपर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहील.” नजीकच्या काळात कॉर्पोरेट नफ्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.